। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने घेतला होता. हा निकाल 20 डिसेंबरच्या मतदानापूर्वीच म्हणजेच 21 डिसेंबरच्या आधी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत मतदानानंतर तातडीने निकाल जाहीर करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे 2 डिसेंबरला झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले. 21 तारखेपूर्वी मतमोजणी घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. उच्च न्यायालयांमधील विविध याचिकांचा, प्रकरणांचा किंवा खंडपीठांच्या आदेशांचा परिणाम होऊन निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नागपूर, औरंगाबाद खंडपीठ किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल, त्यांच्या कोणत्याही आदेशाचा परिणाम निवडणुका लांबण्यावर होऊ नये, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.







