देश हुकूमशाहीच्या वाटेवर; अनंत गीते यांचा आरोप

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जगातील सर्वात मोठी आदर्श लोकशाही म्हणून भारतातील लोकशाहीकडे पाहिले जाते. मात्र, देशामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाबरोबरच लोकशाही, संविधान संकटात आहे. विरोधात बोलणाऱ्यांविरोधात ईडीमार्फत त्रास दिला जातो. ज्याप्रमाणे पुतीन यांनी विरोधक संपविण्याचा घाट घातला आहे. त्याप्रमाणे आपल्या देशातही विरोधक संपविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पुतीनच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले जात आहे. चोर पावलाने हुकूमशाही येण्याची भिती निर्माण झाली आहे. आता राष्ट्रासाठी लढायचे आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून बहुमतांनी निवडून द्या, असे आवाहन अनंत गीते यांनी केले. भविष्यात अलिबागचा आमदार इंडिया आघाडीचा असणार आहे. जिल्हा परिषदमध्येदेखील एक हाती सत्ता घ्यायची आहे. एक वेगळा इतिहास या जिल्ह्यातून घडवायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

बॅ. अंतुले यांनी राजकीय जन्म दिला, पवारांनी नावलौकीक दिले. तसेच, शेकापचे जयंत पाटील यांनी बळ दिले. त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले आहे. काँग्रेसचे नेते माजी आ. मधुकर ठाकूर यांचादेखील तटकरेंनी विश्वासघात केला आहे. अशा विश्वासघातकी माणसाला शिक्षा झालीच पाहिजे. या निवडणुकीत त्यांना त्याची जागा दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा. तटकरेंना रायगडमधील टकमक टोक दाखविल्याशिवाय जनता राहणार नाही, असे गीते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरु आहे. शिवसेनेचा हात पकडून केंद्रात, राज्यामध्ये सत्तेत येणाऱ्या भाजपने शिवसेना फोडली. इतक्यात थांबले नाही, तर राष्ट्रवादी त्यानंतर काँग्रेस फोडली.

ज्या प्रमाणे बकासूर भुक भागविण्यासाठी अनेकांना खात होता. त्याप्रमाणे पक्ष फोडून आमदार घेण्याचे काम भाजपने केले आहे. या बकासुराचा वारस महाराष्ट्रात आहे. त्या बकासुराचा वध महाराष्ट्राची जनता भीमाच्या रुपाने करणार आहे, असा विश्वास गीते यांनी व्यक्त करीत राज्यात पसरलेला अंधार इंडिया आघाडीच्या मार्फत दुर करू, या असे आवाहन केले.

Exit mobile version