बिबट्याच्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी

। चिपळूण । प्रतिनिधी ।

चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथील एका घरात घुसलेल्या बिबट्याने सुवरे दाम्पत्याला जखमी केले आहे. या जखमी दाम्पत्याला प्रसंगावधान राखत स्थानिकांनी डेरवण रूग्णालयात दाखल केले आहे.
विश्‍वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास पाते पिलवली गव्हाणवाडीत कोंबड्या फस्त करण्यासाठी तीन वर्षांचा बिबट्या तुकाराम गंगाराम सुवरे (50) यांच्या घराजवळ आला. त्यांचे घर एका बाजूने उघडे आहे. कोंबड्यांच्या शोधात बिबट्याने घरात उडी मारली. आवाज झाल्याने सुनीता तुकाराम सुवरे (45) यांनी माजघरातला लाईट लावला. तेव्हा बिबट्याची आणि त्यांची नजरानजर झाली.
बिबट्या सुनीता यांना पंजा मारून स्वयंपाकघरात पळाला. तिथून बाहेर पडण्यासाठी जागा नव्हती. तो पुन्हा माजघरात संदुकीवर येऊन बसला. सुनीताने मुलाला उठवले. पुन्हा हालचाल झालेली लक्षात येताच बिबट्या तिथल्या कॉटखाली जाऊन लपला. त्याच कॉटवर सुनीता यांचे पती तुकाराम झोपले होते. त्यांना काहीच कळले नव्हते. कॉटखाली बिबट्या गेल्यावर सुनीताने तुकारामना उठवले. कॉट हलल्याने घाबरलेल्या बिबट्याने तुकारामच्या डोक्यात पंजा मारून पुन्हा स्वयंपाक घरात पळ काढला.
माहिती मिळताच, सकाळी वनविभागाचे पथक दाखल झाले. वनरक्षकांनी बिबट्याचा घरात शोध घेतला. त्या वेळी तो माळ्यावर बसल्याचे लक्षात आले. घराचे दोन्ही दरवाजे आणि खिडक्या उघडून बिबट्याला बाहेर कसे काढायचे, याची चर्चा उपस्थित करत होते. तितक्यात बिबट्याने माळ्यावरून खाली उडीत मारत, मागील दाराने जंगलात पळ काढला.
तरी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पतीपत्नींची प्रकृती उत्तम असल्याचे परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर यांनी सांगितले आहे.

Exit mobile version