अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
। मुंबई वृत्तसंस्था ।
भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पुत्र नील सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी गैरव्यवहारामध्ये गुन्हा दाखल झाल्याने पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
नेमका प्रकार काय आहे?
माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्यांविरोधात फसवणूक आणि विश्वासघात कलमांन्वये तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्याप्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेने सोमय्या आणि त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
संजय राऊतांनीही केली आरोप
विक्रांत युद्धनौका संवर्धनासाठी सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी निधी संकलन अभियान राबवले होते. त्यामध्ये नागरिकांकडून निधी घेण्यात आला होता. त्यात जमा झालेली सुमारे 58 कोटींची रक्कम अद्याप सरकारकडे जमा केली गेली नाही, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा झालेले 58 कोटी रुपये सोमय्यांनी हडप केल्याचा आरोप राऊत यांनी राज्यपाल कार्यालयातील पत्राचा हवाला देत केला होता. त्यानंतर माजी सैनिक भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दिली होती.