अल्पवयीन पुतणीवर लैंगिग अत्याचार प्रकरणी चुलत्याला आजन्म कारावास

| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील वाकण-खांबेश्‍वरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने चुलता असलेल्या एका अपंग व्यक्तीने शारिरीक अत्याचार केल्याच्या पोक्सो गुन्ह्यामध्ये अपंग चुलत्याला माणगांव विशेष न्यायालयाने मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली असल्याने तालुक्यातील अन्य पोक्सो गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपींची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
20 जुलै 2020 रोजी दुपारच्या सुमारास पिडीत आठ वर्षीय मुलीला मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने तिच्या अपंग असलेल्या काकाने तिला बोलावून घेतले आणि ती मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून या प्रकाराबाबत कुणासही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

इयत्ता तिसरीमध्ये शिकणार्‍या या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलादपूर पोलीसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुरूवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करून पिडीत मुलीच्या अपंग काकाला अटक केली. यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक महेंद्र लोणे यांनी दोषारोप पत्र तयार केले तर सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांनी माणगांव येथील मा.जिल्हा व सत्र न्यायालयासमोर दाखल केले.
या पोक्सो खटल्याची सुनावणी माणगाव येथे विशेष न्यायालयामध्ये झाली असता पिडीत मुलीची साक्ष व वैद्यकीय पुरावा महत्वाचा ठरला. या खटल्यामध्ये अतिरिक्त शासकीय अभियोक्ता तथा सहायक सरकारी वकील अ‍ॅड. योगेश तेंडूलकर यांनी सरकार पक्षाचे काम पाहिले आणि अतिशय महत्वाचे न्यायनिर्णय सादर केले. सदर खटल्याचे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरिक्षक यु.एल.धुमास्कर यांनी काम पाहिले.महिला पोलीस हवालदार छाया कोपनर, हवालदार शशिकांत कासार व हवालदार शशिकांत गोविलकर, पोलीस शिपाई सुनील गोळे आणि सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले.

या खटल्यात विशेष व सत्र न्यायाधिश पी.पी.बनकर यांनी घटनेतील गुन्ह्याच्या शाबितीनंतर आरोपी यास 2 मे 2022 रोजी सर्व कलमान्वये दोषी ठरवून मरेपर्यंत कारावासासह 10 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पोलादपूर तालुक्यात गेल्या चार-सहा वर्षांमध्ये पोक्सो गुन्ह्यांची संख्या चिंताजनक असून माणगांव येथील विशेष व सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सध्या जामिनावर असलेल्या पोक्सो गुन्ह्यातील आरोपींचे धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version