हिंदू गोरक्षक, पोलिसांवर स्थानिकांचा हल्ला
| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील हाळ बुद्रुक गावाच्या बाजूच्या रस्त्यावर बैल आणि गायीचे मांस घेऊन जात असताना गोरक्षकांनी रात्रीच्या वेळी पकडले. यादरम्यान हाळ गावातील इतर समाजातील महिला आणि गावकर्यांनी गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.12) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दगडफेकीत दोन गोरक्षक जखमी झाले आहेत. याप्रकरणी खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बारा जणांना अटक केली, तर अनेक साथीदार फरार आहेत. गायीची हत्या करणार्यांवर मोक्का लावण्याची मागणी गोरक्षकांनी करीत अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली आहे.

खालापूर तालुक्यातील हाळ गावाजवळील सागर कॅफे हॉटेलच्या टेम्पोतून दोन काळ्या रंगाचे बैल (गोवंशीय जनावरे) दाटीवाटीने कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. यावेळी गोरक्षकांनी टेम्पो अडविला असता बैल शर्यतीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले आणि हाळ गावात पळाले. त्याठिकाणीच खड्ड्याजवळ उग्र वास आला असता पेंडा बाजूला केल्यानंतर गायीचे मांस, आतड्या, कातडे, मुंडके आढळून आल्यानंतर उपस्थित गोरक्षकांनी पोलिसांना माहिती दिली. हाळ गावातील अन्य समाजाच्या महिला आणि 150 पेक्षा जास्त गावकर्यांनी गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक, बिअरच्या बाटल्या, लाठीकाठीने हल्ला सुरू केला. यावेळी दोन जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, हिंदू समाजातील कार्यकर्ते, गोरक्षकांनी, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी गुरुवारी (दि.13) सकाळपासून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत संबंधितांवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोह रोहिदास भोर करीत आहेत.
एकीकडे होळी सणाची तयारी सुरू असताना खालापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत गोहत्या झाल्याने खळबळ माजली असून, आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी सर्व स्तरातून मागणी होत आहे. या घटनेने खालापूर तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.