भिवंडी येथून एकास घेतले ताब्यात; नेरळ पोलिसांची कामगिरी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या गोवंशीय जनावरांच्या तस्करी प्रकरणाचा नेरळ पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. कोदिवले येथील शेतकरी भाऊ विठ्ठल सोनावणे आणि कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील अंजप गावातील तानाजी माळी यांच्या बैलांची दहा दिवसांपूर्वी कत्तलीसाठी चोरी झाल्याने तालुक्यात खळबळ माजली होती. याच प्रकरणाचा नेरळ पोलिसांनी पर्दाफाश केला असून, भिवंडी येथून एकास ताब्यात घेतले आहे.
या दोन्ही गंभीर प्रकरणांचा तपास वेगाने करत नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केवळ आठ दिवसांत आरोपींपर्यंत पोहोचण्यास यश मिळवले. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुशील काजोळकर तसेच कर्मचारी वाघमारे, राजेश केकाण, बेंद्रे, विनोद वांगणेकर यांनी भिवंडी जि. ठाणे येथील कसाई पाड्यात धाड टाकत एका प्रमुख आरोपीला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वाजिद कुरेशी असे असून, चौकशीदरम्यान त्याने कोदिवले आणि अंजप येथील गोवंशीय जनावरे चोरून कत्तल केल्याची कबुली दिली आहे. त्याचे इतर साथीदार फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
या प्रकरणात पोलिसांकडे सुरुवातीला ठोस पुरावे नसतानाही नेरळ पोलिसांनी सातत्यपूर्ण तपास करत मोठे यश मिळवले. विशेष म्हणजे अंजप येथील तस्करी प्रकरणाने तर जिल्हा पातळीवरही खळबळ उडवली होती. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्वतः या गुन्ह्याचा आढावा घेत तपासाला वेग देण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत यश मिळवत गो तस्करीचा मोठा मागोवा उघडकीस आणला आहे. या कामगिरीमुळे नेरळ पोलीस ठाणे आणि तपास पथकाचे कौतुक होत असून कर्जत-नेरळ विभागातील पोलीस दलाची छाप आणखी मजबूत झाली आहे. पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.







