वरई येथे विजेची तार अंगावर पडल्याने गाईंचा मृत्यू

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील वरई येथे एका शेतकर्‍याच्या तीन दुभत्या गाईंचा विजेची तयार अंगावर पडल्याने मृत्यू झाला. त्या दुभत्या गाईंच्या मृत्यूमुळे शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान झाले असून महावितरण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड यांनी केली आहे.

कर्जत छत्रपती शिवाजी नगरमध्ये राहणारे आणि मूळचे वरई येथील मोतीराम ठाकरे यांच्या तीन दुभत्या गाई वरई येथे आज सकाळी चरायला सोडल्या होत्या. त्यावेळी त्या गाईंच्या अंगावर वीज वाहिनीची तार कोसळली आणि त्या तिन्ही गाईंचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना तात्काळ महावितरण कंपनीला कळविण्यात आली. वीज वाहिनीमधील वीज पुरवठा बंद करण्यात आला. या दुर्घटनेमध्ये शेतकरी मोतिराम ठाकरे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड यांनी केली आहे. महावितरणचे कर्जत उप अभियंता प्रकाश देवके यांच्याशी संपर्क साधून शरद लाड यांनी शेतकर्‍याच्या नुकसानीस महावितरणची वीज वाहिनी जबाबदारी ठरली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने मदत करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्याबद्दल महावितरणचे उपअभियंता देवके यांनी दहिवली विभागाचे सहायक अभियंता यांना वरई दुर्घटनेचा पंचनामा करून प्रस्ताव महावितरणकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Exit mobile version