डोंगर एका रात्रीत गाव गिळेल

डांगी आदिवासीवाडीवर इर्शाळवाडीच्या दुर्घटनेचे सावट

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डुसपासून सात किमी डोंगरावर असलेल्या डांगी आदिवासीवाडीवर दरड आणी भूस्खलनाचे संकट ओढवले आहे. या वाडीत 200 घरांचा उंबरठा असलेली लोकवस्ती असून, नवजात बालक, महिला, तरुण आबालवृद्ध या ठिकाणी वास्तव्यास आहेत. गावालगतचा डोंगर व माती खचून मोठ्या दुर्घटनेची चाहूल गावकर्‍यांना लागली आहे. डांगी आदिवासी वाडीच्या सभोवताली तीन किलोमीटरपर्यंत डोंगर खचून मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगा मानवी वस्तीलगत आल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत. एखाद्या रात्री अख्खे गाव या भेगा गिळून टाकेल, अशा भीतीने गावकरी त्रस्त आहेत. अशातच या भेगांमुळे येथील पिकत्या शेतजमिनीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. भूगर्भात भयानक हालचाली सुरू असून, हळूहळू संपूर्ण गाव मातीत गाडले जाण्याची भीती ग्रामस्थांना सतावत आहे.

दरम्यान, ग्रामस्थ महादेव रामा भवर यांनी सांगितले की, आमच्या गावात अतिशय दुर्घटनेची अवस्था आहे. पाच-सहा वर्षे जमिनीला भेगा पडतात, शासन कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत. इर्शाळवाडीसारखी भयानक घटना घडेल असं वाटतंय. 100 फुटांच्या अंतरावर आमचं गाव आहे. आमचा संपूर्ण गाव डोंगराखाली गाडला जाणार आहे. कुणी वाचणार नाही, सरकारने आमचे जीव वाचवावे, अशी हाक भवर यांनी दिली.

येथील रहिवासी अर्चना ठोंबरे म्हणाल्या की, आमच्या गावात अशी परिस्थिती आहे की, जगणं मुश्किल झाले आहे. आज इथं आम्ही सर्व लोक दिसतोय, उद्या इथं काही झाले तर कुणीच दिसणार नाही. मेल्यावर इथं येऊन काय भेटेल, पाच-पाच लाख; परंतु, त्या पैशाने माणसं परत येतील का? रोज जमीन फाटत जाते, गुरं जमिनीत गाडली जातात, आता माणसं पण जमिनीत गाडली जातील, एवढी भीती वाढली आहे. शासनाने काही उपाय करावा. शेतकरी नांग्या ठोंबरे यांनी, शेतीला भेगा पडल्या, आमची दीड एकर शेती गेली. आम्ही खावं काय, जगावं कसे, दरवर्षी भेगा पडतात. महागाई वाढली, मुलंबाळ जगवावी कशी, असा सवाल उपस्थित केला तर अधिकार्‍यांना आमचे हाल बघायला वेळ नाही असे म्हटले. इथं मुबलक पाणी , आरोग्य आणि शिक्षण विषयक सुविधाही नाहीत अशी ओरड येथील ग्रामस्थांनी केली. लवकरात लवकर शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version