| माथेरान | वार्ताहर |
माथेरानच्या डोंगर कुशीत वसलेले गारबटवाडी गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास डोंगराचा काही भाग भूस्खलन होऊन कोसळला आहे. तर, जमिनीलादेखील मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. घटनास्थळी तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने पाहणी केली.
गारबटवाडी गावात पहाटेच्या सुमारास डोंगराचा काही भाग कोसळला आहे. जमिनीला तडा गेल्याने तीनशे-साडेतीनशे लोकांची वस्ती असलेल्या या गावाला आता भूस्खलनाचा धोका निर्माण झाला. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी व आपत्ती व्यवस्थापन प्रशासन यांनी गावाला भेट देत, नागरिकांना स्थलांतर होण्यासाठी सूचना केल्या आहेत. पनवेल तालुक्यातील धोदाणी गावातही डोंगराचा भाग खचून गावाला धोका निर्माण झाला. येथे ग्रामस्थ रात्रभर जागून आहेत. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असल्याने डोंगर परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे जीवन मात्र धोक्यात आले आहे.