चिंचोटी डोंगराला पडल्या भेगा; भूस्खलन होण्याची शक्यता

उत्खननामुळे ओढवणार आपत्ती; वनविभागाच्या दुर्लक्षामुळे संकट

। रायगड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असून, मुसळधार पावसाने अलिबाग तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. सुरुवातीच्याच पावसात तालुक्यातील चिंचोटी गावाच्या लागत असणार्‍या डोंगराला भेगा पडल्याने येथे भूस्खलन होण्याची शक्यता आहे. सावधगिरीचा पर्याय म्हणून या डोंगर परिसरातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. चिंचोटीच्या डोंगराला पडलेल्या भेगा या डोंगराखाली झालेल्या माती उत्खननामुळे येथील जमीन सरकत आहे. होणार्‍या उत्खननाकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने दरड कोसळण्याचे संकट ओढवणार असल्याचे पर्यावरण तज्ज्ञाचे मत आहे.

गतवर्षी अलिबाग तालुक्यातील ताजपूर गावाच्या पूर्वेकडील बाजूला असणार्‍या डोंगरातील दरड कोसळली होती. यावेळी प्रशासनाने ग्रामस्थांना सावधगिरीचा इशारा देत स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गतवर्षी खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळण्यापूर्वीची माहिती समोर आली तेव्हा त्या ठिकाणीदेखील झालेले उत्खनन आणि डोंगराला पडलेल्या भेगा याच आपत्तीला कारणीभूत ठरल्या होत्या. आता चिंचोटी गावातील डोंगराला भेगा पडल्या आहेत. चिंचोटी डोंगरावर वनविभागाने अनेकदा वृक्षारोपण केले आहे. यामुळे या डोंगरावर माती घट्ट पकडून ठेवणारी झाडे आहेत. परंतु, ज्या ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्या डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या डोळ्यात धूळ फेकून मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. यामुळे डोंगराची माती वरच्या बाजूने सैल पडली असल्याचे गावातील राकेश पाटील यांनी सांगितले.

भेगा पडलेल्या डोंगराच्या पायथ्याची लोकवस्ती नाही. लोकवस्ती तेथून दूर आहे. परंतु, दरड कोसळण्याची भीती लक्षात घेता त्या घरातील नागरिकांना स्थलांतर करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येथे घरे नसली तरी तब्बल दोन हेक्टर शेतजमीन दरडीखाली जाऊन शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. डोंगराला भेग पडल्यानंतर त्याठिकाणी वनविभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद विभाग आणि पोलीस विभागाच्या प्रतिनिधींनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी राम मांढरे, तलाठी शशिकांत कांबळे, वनविभाग अधिकारी मोकल, ग्रामसेवक दिवकर, पोलीस विभागाचे किरवले आणि चिंचोटीमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

या पाहणीनंतर वनविभागाने डोंगरातीळ जमिनीला गेलेल्या तांड्याचा भौगोलिक अभ्यास करण्याबरोबर भूस्खलन होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिल्या आहेत. काही ग्रामस्थांनी भविष्यातील आपत्तीचा धोका ओळखून ज्या ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्याठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी वर्गाला केली आहे.

Exit mobile version