घरे अन् शेतजमिनींना तडे; 18 ठिकाणी कोसळल्या दरडी

पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यामध्ये 12 वाडया असलेल्या वाकण ग्रामपंचायतीच्या हद्दीत तब्बल 18 ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना दिसून येत आहेत. वाकण ग्रामपंचायत हद्दीतील धामणेची वाडी आणि सानेवाडी येथे जमिनीला आणि घरांना भेगा पडलेल्या दिसून येत आहेत. येथील ग्रामस्थांना कापडे येथील तात्याबा साने या रेशन दुकानदारांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे.

या ग्रामस्थांच्या चाळीसहून अधिक म्हशी, गाय, बैल, वासरू या पशुधनासाठी मोकळया जमिनीवर कोंडवाडा बांधण्यात येऊन ठेवण्यात आले आहे. वाकणमधील धामणेची वाडी- सानेवाडी येथे जमिनीला पडलेल्या भेगा थेट आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावाच्या डोंगरापर्यंत पोहोचल्या आहेत. घरातील भिती आणि जमिनीला पडलेल्या भेगा घराबाहेरील जमीनीलाही दूरवर पडल्या असल्याचे दिसून येत आहेत. या भेगा डोंगरदरीत मोठया आकाराच्या दरडी कोसळल्यानंतर तयार झाल्या असाव्यात, असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

मात्र,जमिनीला पडलेल्या भेगा आणि त्याच भेगांचे शेवटचे टोक दरीमध्ये दरडी कोसळण्याचे कारण असल्यास भुवैज्ञानिक व भुगर्भतज्ज्ञांकडून याबाबत पाहणी करून वाकण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील धामणेचीवाडी- सानेवाडीतील ग्रामस्थांचे कायमचे स्थलांतरण करुन पुनर्वसन करण्यासंदर्भात शासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे.

पोलादपूर प्रभारी तहसीलदार समीर देसाई यांनी, 27 ते 30 ऑॅगस्ट 2021 कालावधीत भुगर्भ वैज्ञानिकांचे पथक पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार असून त्यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार शासनाकडे स्थलांतर व पुनर्वसनासाठी शिफारस करण्यात येईल, अशी माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.

Exit mobile version