गाळातच साठवण तलावाची निर्मिती

ठेकेदाराने धुडकावल्या सूचना; अंभेरपाडा ग्रामस्थ आक्रमक

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यात असलेल्या दुर्गम भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होतात. पाण्याचे स्त्रोत आटल्याने जलजीवन मिशन योजनादेखील बिनकामाची ठरली आहे. त्यामुळे शासनाकडून पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण अवलंबले जात आहे. तालुक्यातील अंभेरपाडा गावात यासाठी 2 कोटी 19 लाख रुपये खर्चून साठवण तलाव बांधला जात आहे. मात्र, हे बांधकाम होत असताना ग्रामस्थांनी केलेल्या सूचना ठेकेदाराकडून धुडकावल्या जात आहेत. तर तलावातील गाळ काढला गेला नसल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहेत. तेव्हा हे काम गावासाठी कि ठेकेदारासाठी, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कर्जत तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. निसर्गसंपन्न असलेल्या या तालुक्यात डोंगर दुर्गम भागदेखील आहे, तर या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची वस्ती आहे. उन्हाळ्यात उन्हाच्या झळांसोबत या भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या झळादेखील तीव्र होतात. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. शासनाकडून पाणी टंचाई आराखडा तयार होत असला तरी प्रत्यक्षात तुटपुंज्या टँकरच्या भरवशावर पाणी टंचाईवर मात होत नाही हे वास्तव आहे. दुसरीकडे शासनाच्या जलजीवन मिशनमधून तालुका टँकरमुक्त होईल अशा आशेवर असलेल्या नागरिकांच्या आशा अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. कारण जलजीवन मिशन योजनांचे स्रोतच कोरडे ठाक पडले आहेत. दरम्यान शासनाने यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या जुन्या धोरणाचा पुन्हा अवलंब केला असल्याचे चित्र तालुक्यातील अंभेरपाड्यात पाहायला मिळत आहे.

तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या अंभेरपाड्यात वाहणार्‍या ओढ्यावर पूर्वीचा छोटा बंधारा होता. त्यावर शासनाच्या माध्यमातून जलसंधारण मृदू व जलसंधारण विभागाकडून साठवण तलाव प्रस्तावित करण्यात आला. यासाठी 2 कोटी 12 लाख 38 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात अधिकच्या 4.70 टक्के दराने भाग एकसाठी निविदा ठेकेदाराने भरली ती मंजूरही झाली. त्यामुळे प्रकल्पाची मूळ रक्कम 7 लाख 19 हजार रुपयांनी वाढली. सोलापूरच्या पृथ्वी लॅन्डमार्क्स अँड डेव्हलपर्स यांना ठेका देण्यात आला. 15 मार्च 2024 रोजी या कामाचे कार्यारंभ आदेश ठेकेदाराला देण्यात आले. अर्धा उन्हाळा उलटल्यावर आदेश मिळाल्याने कामासही उशीर झाला. ठेकेदाराने काम सुरु केले मात्र, आजुबाजूला शेतकर्‍यांच्या जमिनीदेखील या प्रकल्पात बाधित होत होत्या. परंतु, गावाला पाणी मिळेल याकरता सगळ्यांनी सहकार्य करण्याचे ठरवले. बंधारा उभा राहिला पिचिंगचे कामदेखील अर्धे झाले. मात्र, साठवण भागातील माती, गाळ काढण्याबाबत गावकर्‍यांनी ठेकेदाराला सुचित केले. इतरही काही त्रुटींबाबत ग्रामस्थांनी ठेकेदाराला सांगितले असताना ठेकेदार मात्र ऐकून घेण्यास तयार नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या सूचना धुडकावून काम करत असल्याने यात पाणीसाठा जास्त न होता अखेरीस ग्रामस्थांना याचा त्रास होणार असल्याने आता ग्रामस्थ याबाबत आक्रमक झाले आहेत. यामुळे मोठा संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

या कामात खरंतर गाळ किंवा माती काढणं समाविष्ट नाही. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर याबाबत आपण नक्कीच इतर कुठली तरतूद करून माती काढण्याचे काम करू. आणि ग्रामस्थांशी उलट वागणं हे चुकीचे आहे. याबाबत ठेकेदाराला सूचना देण्याचे काम करू. ग्रामस्थांच्या सूचना ऐकून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विलास देशमुख,
उपअभियंता मृदू व जलसंधारण उपविभाग कर्जत
Exit mobile version