। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
आंबा, काजू बागायतदारांच्या खात्यात पीक विमा परतावा जमा होण्यास सोमवार (दि.21) पासून सुरूवात झाली आहे. पीकपरताव्यातून वगळलेल्या 9 मंडळांना देखील परतावा मिळणार आहे. परताव्याच्या रक्कमेत सुमारे एक कोटीने वाढ झाली आहे. पीक परताव्याकरीता गेले दीड दोन महिने जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले होते.
हवामानावर आधारीत पीकविमा योजनेत सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू पिकांचा समावेश आहे. आंबा पिकाखालील 14 हजार 668 हेक्टर क्षेत्र तर काजू पिकाखालील 5 हजार 243 हेक्टर क्षेत्र असे एकूण 19 हजार 911 हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले. या योजनेत जिल्ह्यातील 42 हजार 190 शेतकर्यांनी सहभाग घेतला होता. गेल्या महिना दीड महिन्यापासून सातत्याने पीक परतावा मिळावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. पीक विमा कंपनीने सुरूवातीला 57 पैकी 56 मंडलातील आंबा पिकाला आणि 46 मंडलातील काजु पिकाला 67 कोटी 94 लाख 3 हजार 480 रूपये पीक विमा परतावा मंजुर केला होता. त्यानंतर काजुपिकाकरीता वगळलेल्या 10 पैकी 9 मंडलामध्ये स्वयंचलित केंद्रे नसल्यामुळे या मंडलातील शेतकर्यांना नजीकच्या मंडलातील नोंदीप्रमाणे परतावा मिळावा याकरीता कृषी विभागाचे प्रयत्न सुरू होते. आता 9 मंडलांना परतावा मिळणार आहे. त्यामुळे पिक परताव्याची रक्कमेत 1 कोटी रूपयांची वाढ झाली आहे.







