लहान मुलांचे कचर्‍यावरच अंत्यसंस्कार

कळंबुसरेमधील विदारक घटना

| उरण | वार्ताहर |

कळंबुसरे गावातील लहान मुलाच्या दफन भूमी वर रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. अशा कचर्‍यावरच मयत झालेल्या एका लहान मुलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कळंबुसरे गावातील मयत मुलांच्या कुटुंबावर आल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे.

स्थानिक ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिका यांनी आपापल्या परिसरातील मयत इसमांचे अंत्यसंस्कार हे सुसज्ज, चांगल्या जागेवर व्हावेत यासाठी हक्काची जागा म्हणून मुक्तीधाम (स्मशानभूमी) लहान मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी दफनभूमीची जागा उपलब्ध करून दिली आहे. उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील लहान मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी ही शासन, स्थानिक ग्रामपंचायतीने दफन भूमीची जागा ही गावा जवळ नियोजित केली आहे.

परंतु कळंबुसरे गावातील रहिवाशांसाठी हक्काचे डम्पिंग ग्राउंड नसल्याने घरातील केरकचरा हा गावा जवळील लहान मुलांच्या दफन भूमीच्या जागेवर टाकला जात आहे. त्यामुळे सदर दफनभूमीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात केर कचरा विखुरलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. एकंदरीत सदर जागा ही लहान मुलाची दफन भूमी की कचर्‍याचे डम्पिंग ग्राउंड असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यातच नुकताच मयत झालेल्या कळंबुसरे गावातील लहान मुलांवर अंत्यसंस्कार हे विखुरलेल्या कचर्‍यावरच करण्याची नामुष्की सदर मुलांच्या कुटुंबावर ओढावली आहे. त्यामुळे जनमानसात संतापाची भावना निर्माण झाली आहे.

Exit mobile version