सिडकोच्या माध्यमातून हक्काची स्मशानभूमी
| उरण | वार्ताहर |
उलवे नोडवासियांना तब्बल 17 वर्षानंतर हक्काची स्मशानभूमी मिळाली आहे. त्यामुळे मृत्यूनंतर कुठे दहन करायची याची चिंता मिटली. त्यासाठी होणारी ससेहोलपट देखील यानिमित्ताने थांबली आहे. यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पुढाकार घेतला.
उलवे नोड परिसरात गेल्या 17 ते 18 वर्षात दोन लाखाहुन अधिक लोक रहायला आले आहेत. परंतू कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी उलवे नोडसाठी स्मशानभूमी नसल्यामुळे, प्रकल्पग्रस्त गावकर्यांना विनंती करावी लागत असे. त्यातील अनेक गावांनी नोडलमधील मयत त्यांच्या स्मशानात जाळण्यासाठी मज्जाव केल्यामुळे मयत घेऊन नातेवाईकांना सीबीडी बेलापूर, खारघर, वाशी येथे अंत्यविधीसाठी जावे लागत असे.
यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सिडकोस्तरावर एम.डी., जॉईंट एम.डी. यांच्या बरोबर उलवे नोड नागरिकांच्या बैठका घेतल्या आणि समस्या सोडविण्यासाठी तातडीने सुरवात केली. गेल्या 5 वर्षांच्या खडतर पाठपुराव्याने दीड कोटी निधी मंजूर करून उलवे नोडसाठी हक्काची स्मशानभूमी सेक्टर 14 मध्ये बांधण्यास घेतली व उलवे नोड वासीयांची मृत्यू नंतर होत असलेली ससेहोलपट थांबली आहे