। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित अलिबागमध्ये नव्या वर्षात नाईट टेनिस क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेंचा थरारा 9 ते 11 जानेवारी दरम्यान अलिबाग शहरातील क्रीडा भुवन येथील मैदानात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी 16 आमंत्रित संघाचा समावेश असणार असून या स्पर्धा अलिबाग तालुका मर्यादीत होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
गतवर्षापासून सुरु केलेल्या नाईट टेनिस क्रिकेट लीग स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला 2 लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला 1 लाख रुपये व चषक तसेच, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर स्पर्धेतील मालिकावीराला दुचाकी, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाजांना सायकल आणि विजेत्या व उपविजेत्या संघाला एलईडी टीव्ही देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा प्रो लिंक स्पोर्ट्स व एफएच स्पोर्ट्सवरदेखील घरबसल्या पहाता येणार आहे. 2025 या नव्या वर्षात क्रिकेट खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपिठ या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.