15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
। केरळ । वृत्तसंस्था ।
क्रिकेट खेळताना जर सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर खेळाडूच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये घडला आहे. या ठिकाणी क्रिकेट खेळताना एका 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुदैवी घटना केरळमधील कोट्टाक्कल शहरात घडली आहे. या मुलीचे नाव तपस्या असून ती मूळची महाराष्ट्राची रहिवासी आहे. क्रिकेटच्या सरावाच्या वेळी तिच्या डोक्याला चेंडू लागून गंभीर दुखापत झाली. यानंतर तिला त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, कालांतराने तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. यानंतर तपस्याच्या कुटुंबीयांनी तिला महाराष्ट्रातील रुग्णालयात हलवले. मात्र, डोक्याला झालेली दुखापत गंभीर असल्यामुळे बुधवारी (दि.30) तिचा मृत्यू झाला. तपस्या ही दहावीची विद्यार्थिनी होती, जी तिच्या शाळेतील मित्रांसोबत हेल्मेट न घालता क्रिकेटचा सराव करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गोलंदाज जेव्हा चेंडू टाकण्यासाठी धाव घेत होता, तेव्हा तपस्याचे लक्ष खेळपट्टीवर पडलेल्या एका गोष्टीकडे गेले. अशा परिस्थितीत या 15 वर्षीय मुलीने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडूचा बॅटशी संपर्क झाला नाही आणि तो सरळ तिच्या डोक्यावर आदळला. डोक्याला चेंडू लागल्यानंतर तपस्या लगेचच जमिनीवर पडली. क्रिकेटचा चेंडू खूप कठीण असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही फलंदाज मैदानावर खेळण्यासाठी पूर्ण सुरक्षिततेने येत असतात. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशीच एक घटना घडली होती. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख खेळाडू फिल ह्यूज याचा क्रिकेटचा चेंडू लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.