गावोगावी रंगू लागल्या क्रिकेट, कबड्डीच्या प्रीमियर लीग

लाखोंची बक्षिसे, मोठ्या चषकांना मागणी

| सुधागड-पाली | वार्ताहर |

रायगड जिल्हा कबड्डीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. या मातीत असंख्य मातब्बर कबड्डीपटू उदयाला आले आहेत. याबरोबर येथील लहानग्यांसह मोठ्यांनादेखील क्रिकेटचे प्रचंड प्रेम आहे. मात्र, कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून कबड्डी व क्रिकेटच्या स्पर्धा बंद असल्याने खेळाडू व क्रीडा रसिकांचा प्रचंड हिरमोड झाला होता. मात्र, आता हिवाळ्याच्या हंगामात सध्या जिल्ह्यातील गावागावात, अगदी गल्लीबोळातदेखील क्रिकेट आणि कबड्डीच्या प्रीमियर लीग रंगू लागल्या आहेत. येथे हजारो व लाखो रुपयांची बक्षिसे दिली जात आहेत. शिवाय, मोठ्या चषकांनादेखील अधिक मागणी आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी व रसिकांच्या आनंदाला उधाण आले आहे. शिवाय, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना व गतीदेखील मिळत आहे.

या प्रीमियर लीग पक्षाच्या किंवा त्या गावाच्या किंवा शहराच्या नावाने अगदी एखाद्या आळीच्या किंवा मंडळाच्या नावाने, तसेच एखाद्या व्यक्तीच्या समरणार्थ भरविल्या जात आहेत. गावातील सरपंच ते मोठा नेता व पुढारी यासाठी बक्षिसांची रक्कम किंवा पूर्ण स्पर्धेचे आयोजन करतात. एकूणच, या स्पर्धांमुळे गाव खेड्यातील प्रतिभावंत व होतकरू खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व जोडीला थोडेफार आर्थिक पाठबळदेखील मिळत आहेत.

गावागावातील मैदाने किंवा शेतात या स्पर्धा भरविल्या जातात. त्यासाठी मंडप बांधले जातात. सोबत डीजेदेखील लावला जातो. चांगले निवेदक बोलविले जातात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच यासाठी नेमले जातात. एकूणच, सर्व कार्यक्रम भारदस्त केले जात आहेत. या लोकांनादेखील रोजगाराची संधी मिळत आहे. तसेच यावेळी मंडप व डेकोरेशन वाले, वडापाववाले, सरबत, पाणीवाले आदी व्यावसायिक व विक्रेत्यांनादेखील चांगला धंदा मिळतो. आयोजकांच्या नावाचे व लोगो असलेले विविध टी शर्ट छपाई केली जाते. चषक विक्रेत्यांचादेखील चांगला व्यवसाय होत आहे. एकूणच, या प्रीमियर लीगमुळे जणूकाही गाव खेड्यातील अर्थव्यवस्थेला उभारी आणि चालनासुद्धा मिळत आहे. असे पालीतील आयोजक व व्यावसायिक सिद्धेश दंत यांनी सांगितले. तसेच पुढारी व नेते यांच्यामध्ये राजकारण व चढाओढदेखील रंगलेले पहायला मिळते.

मोठ्या चषकांना मागणी
जिल्ह्यात सध्या मोठ्या चषकांना मागणी वाढली आहे. प्रीमियर लीगच्या कार्यक्रम पत्रिकेतदेखील भव्य चषकाचा आवर्जून उल्लेख केलेला आढळतो. अगदी कमी रकमेच्या स्पर्धेतसुद्धा भव्य चषक पहायला मिळतो. परिणामी, चषक विक्रेतेदेखील सुखावले आहेत, असे चषक विक्रेते मुकुंद कोसुंबकर यांनी सांगितले.

गावखेड्यातील प्रतिभावंत खेळाडूंना या प्रीमियर लीगद्वारे हक्काचे व्यासपीठ मिळत आहेत. यातून काही खेळाडूंना राज्य, देश व राष्ट्रीय पातळीवर जाण्याची संधीदेखील मिळू शकेल. या स्पर्धांद्वारे युवक व तरुणांमध्ये सांघिक भावना, नेतृत्वगुण, विविध कौशल्य व क्षमता विकसित होतात.

ललित ठोंबरे
प्रीमियर लीग आयोजक, सुधागड
Exit mobile version