फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव विरुद्ध एसबीसी महाड अंतिम सामना.
| पोयनाड | प्रतिनिधी |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील 40 षटकांच्या एकदिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी(दि.9) झालेल्या दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाने भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण संघावर 30 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. रविवारी (दि.11) फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव विरुद्ध एसबीसी महाड या दोन संघांमध्ये अंतिम लढत होणार आहे.
स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम साखळी व नंतर बाद पध्दतीने संपूर्ण स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. 18 साखळी फेरीचे 2 पात्रता फेरीचे 2 उपांत्य फेरीचे तर 1 अंतिम फेरीचा सामना असे 23 एकदिवसीय सामने खेळवले गेले. शुक्रवारी(दि.9) झालेल्या दुसर्या उपांत्य फ्ररीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघांनी 40 षटकांच्या समाप्ती नंतर 8 गडी बाद 213 धावसंख्या उभारली.
प्रतिउत्तरात भेंडखळ संघांनी कडवी झुंज देत 183 धावा केल्या. आशिर्व पाटील 62 तर आयुष घरत यांनी 61 धावांचे संघाला योगदान दिले, माणगाव संघाकडून ऋग्वेद जाधव व आकाश चौधरी यांनी प्रत्येकी 3, तर तुकाराम दळवी यांनी 2 फलंदाज बाद केले, माणगाव संघांनी केलेल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे भेंडखळ संघाला जिंकलेला सामना गमवावा लागला.
माणगाव संघाच्या पृथ्वीराज जावके याला सामनावीर, भेंडखळ संघाचा आशिर्व पाटील स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, आयुष घरत व निल जाधव इमॅर्जिंग प्लेयर तर तनिष्क टेमकर व आरुष ठाकूर यांना उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून किशोर तावडे, अजय टेमकर, सुजित साळवी, नयन कट्टा, डॉ.भूषण पाटील, रोहित काळे, संकेश ढोले, आदेश नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.