झुंझार पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धा ; पनवेलची अलिबाग संघांवर मात

युग जोशी विजयाचा शिल्पकार
। पोयनाड । वार्ताहर ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित बारा वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट लीग स्पर्धेत पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीचा सलामीचा फलंदाज युग जोशी याने पहिलेवहिले शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला. युगच्या 125 धावांच्या जारोवर पनवेल संघाने अलिबाग संघापुढे 230 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात अलिबाग संघाला 165 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे अलिबागने हा सामना 64 धावांनी गमावला.
दरम्यान, दि क्रिकेट अकॅडमी अलिबाग विरुद्ध खेळताना 21 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने युग जोशीने 125 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या पनवेल संघाने दमदार फलंदाजी करत 40 षटकांमध्ये 10 गडी बाद 230 केल्या. त्यामध्ये सलामीला आलेल्या युग जोशी याने सुरेख फलंदाजी केली. एका बाजूने गडी बाद होत असताना, दुसरी बाजू भक्कमपणे सांभाळत पनवेल संघासाठी धावांचा डोंगर रचला. अलिबागकडून पार्थ वेधक याने तीन बळी घेतले. पनवेलच्या 230 धावांचा पाठलाग करताना अलिबाग संघाने सुरेख सुरुवात केली. पार्थ म्हात्रे, ओम भगत आणि ओम वार्डे यांनी अलिबाग संघाची धावसंख्या 40 षटकांच्या अखेरीस 5 गडी बाद 165 पर्यंत पोहोचवली.पनवेल संघाने सामना 64 धावांनी जिंकला.
युग जोशी सामनावीर, तर स्टार अपोनर म्हणून ओम भगत तर उदयोन्मुख खेळाडू म्हणून पार्थ म्हात्रे, पार्थ वेदक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वेदांत नवरत्न आणि आर्यन दवटे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील बारा संघांनी सहभाग घेतला असून, प्रत्येक संघाला तीन लीग सामने खेळण्यास मिळणार आहेत. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर युवा खेळाडू पोयनाडच्या झुंझार युवक मंडळाच्या क्रीडांगणावर क्रिकेट खेळाचा मनमुरादपणे आनंद घेताना दिसत आहेत.

Exit mobile version