सागर सम्राट न्हावे आयोजित क्रिकेट स्पर्धा

अलिबागचा सॅन्डी वॉटर स्पोर्ट संघ विजेता

| चणेरा | प्रतिनिधी |

दत्त जयंतीच्या औचित्याने सागर सम्राट क्रिकेट संघ, न्हावे यांच्या वतीने पर्व 40 वे आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर चाललेल्या या रोमांचक स्पर्धेत परिसरातील विविध संघांनी सहभाग नोंदवून आपली उत्तम क्रिकेटकौशल्ये सादर केली. छोटेखानी पण तुलनेने तुफानी अशा दोन षटकांच्या सामन्यांमुळे प्रेक्षकांना सतत उत्कंठावर्धक क्षण अनुभवायला मिळाले.

अंतिम सामना सॅन्डी वॉटर स्पोर्ट अलिबाग विरुद्ध खेडेकर इलेव्हन तळेखार यांच्यात खेळविण्यात आला. नाणेफेक जिंकताच सॅन्डी वॉटर स्पोर्ट संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी उत्तम मारा करत प्रतिस्पर्धी खेडेकर इलेव्हन संघाला मर्यादित 9 धावांवर रोखले. विजयासाठी केवळ 10 धावांचे छोटे पण तणावपूर्ण लक्ष्य असताना अलिबाग संघाने आक्रमक फलंदाजी करत फक्त एका षटकात हे लक्ष्य गाठले आणि स्पर्धेचा अंतिम विजेता म्हणून ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विजयानंतर अलिबागच्या समर्थकांमध्ये आनंदाचा जल्लोष उसळला.

स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सागर सम्राट, न्हावे ब संघाने तृतीय क्रमांक पटकावला, तर आर. बी. सी. चणेरा संघाने चतुर्थ क्रमांक मिळवत आपली दमदार उपस्थिती नोंदवली. विजेत्या चारही संघाना भव्य ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. सर्व संघांनी खेळात दाखवलेल्या शिस्तबद्धतेचे आणि क्रीडाभावाचे उपस्थितांनी कौतुक केले. विजय घाणेकर यांना संपूर्ण स्पर्धेत सर्वांगीण उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल मालीकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. अंतिम सामन्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या आयुष बोकाडे याला उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहवर्धक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक सागर सम्राट क्रिकेट संघ, न्हावे यांनी सर्व खेळाडू, समालोचक, पंच, प्रेक्षक तसेच सहयोगी मंडळींचे मनःपूर्वक आभार मानले. स्पर्धेत समालोचनाची जबाबदारी दशरथ पाटील, याशीन मर्चंड, प्रदिप भोईर, हरेश दिघीकर, सादीक रोगे व उपेश तांडेल यांनी सांभाळली. तर पंच म्हणून कल्पेश म्हात्रे आणि नितेश नरहरी यांनी अचूक निर्णय देत सामने सुरळीत पार पाडले. गुणलेखनाची जबाबदारी धर्णे गुरुजी यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली. दत्त जयंतीनिमित्त रंगलेल्या या स्पर्धेने स्थानिक पातळीवर क्रिकेटप्रेमींसाठी एक संस्मरणीय क्रीडा पर्व ठरविले.

Exit mobile version