क्रिकेट विश्वचषक की ‌‘इव्हेन्ट’चषक!

एखाद्या जंगी मेजवानीची तयारी करावी, अपेक्षेने मेजवानीवर ताव मारण्यासाठी जावे आणि ताटात काहीतरी मिळमिळीत पडावे, पूर्णपणे भ्रमनिरास व्हावा, अगदी तशीच गत मोठा गाजावाजा करण्यात आलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची झाली. याचं कारण, हा विश्वचषकातील सामना आहे की भारत-पाकिस्तान यांच्यातील एखाद्या मालिकेतला, असं वाटत होतं. पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्चर यांनी तसे बोलूनही दाखविले.

याचं कारणही तसंच होतं. पाहुण्यांना निमंत्रित करावे, मात्र त्यांचा योग्य पाहुणचार करू नये, असेच वातावरण अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमवर होते. पाकिस्तानी नागरिकांना ‌‘व्हिसा’ न मिळाल्याने त्यांच्या देशाचा राष्ट्रध्वज स्टँडमध्ये दिसण्याचा प्रश्नच नव्हता. विश्वचषक क्रिकेट स्पर्र्धेत आयसीसीचे अनेक निकष असतात. त्यानुसार प्रतिस्पर्धी संघांना स्टेडियमवरील प्रत्येक गोष्टीत समान मान दिला जातो. हैदराबाद येथील सामन्यात आयसीसीचे ते निकष पाळले गेले. अहमदाबादच्या स्टेडियमवर सारं काही विसरलं गेलं. उभय देशांची गाणी सामन्यादरम्यान वातावरणनिर्मितीसाठी वाजविली जातात. जी हैदराबादमध्ये वाजविली गेली. भारतीय गीतांप्रमाणेच पाकिस्तानी गीतांचे स्वरही हैदराबादमध्ये स्टेडियममध्ये घुमत होते. पाहुण्या संघाला आपण परक्या ठिकाणी नाहीत, असं किमान वाटावं, हा त्यापाठचा हेतू होता. हा पायंडा अहमदाबादला पाळलेला दिसला नाही. भारतीय गाणी, जय श्रीराम आणि अन्य घोषणांनी पाक संघाला आणखी परकेपणाची जाणीव करून देण्यात आली. किमान खेळाच्या मैदानावर तरी असे व्हायला नको होते. पाकिस्तानी खेळाडूंच्या फटक्यांना दाद मिळत नव्हतीच; परंतु त्यावेळची भयाण शांतता आपले बेगडी क्रीडाप्रेम दर्शवित होती. भारतीय क्रिकेट संघ जेव्हा कधी पाकिस्तानात खेळायला जाईल, तेव्हा त्याच पाहुणचाराची परतफेड केली गेली, तर दोष कुणाचा?

पाहुणचाराचे जाऊ द्या; 11 विरूद्ध सव्वा लाख असा तो सामना. क्रिकेटच्या पातळीवरही तसाच झाला. 2 लाख 155 वरून सर्व बाद 191 अशी पाकिस्तानची घसरगुंडी दोन्ही संघांच्या मानसिकतेचेही दर्शन घडविणारी होती. पाकिस्तानचा संघ त्या वातावरणात पूर्णपणे खच्ची झालेला वाटला. अशा आयोजनामुळे आयसीसीचा क्रिकेट विश्वव्यापी करण्याचा कोणता हेतू साध्य होणार आहे? 50 षटकांचे क्रिकेट अखेरची घटका मोजत असताना; अतिरंजित वातावरणनिर्मिती करून आयोजित केलेल्या सामन्याचा असा विचका झाल्यानंतर कोणते क्रिकेट वाढणार आहे?

एकतर ट्वेंटी-20 क्रिकेटने 50 षटकांच्या क्रिकेटचे मार्केट पूर्णपणे खाल्ले आहे. या क्रिकेटला भारतात ऑक्सिजन मिळेल असे वाटले होते. पण अशा नीरस, एकतर्फी सामन्यामुळे हे क्रिकेट लोकप्रिय होणार की लोकांच्या मनातू उतरणार याचा अंदाज बांधण्याची वेळ आता आली आहे. कधी कधी वाटतं सामन्याआधीची जाहिरातबाजी काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी होती का? मिकी आर्थर म्हणतो त्याप्रमाणे हा सामना विश्वचषकाचा की बीसीसीआयच्या एखाद्या मालिकेतील होता. तिकिटांचे नियंत्रण नेमके कुणाकडे होते? सामन्यासाठी आलेले प्रेक्षक हे क्रिकेटप्रेमी होते की भारताचे पाठीराखे? हेच कळत नव्हते. त्यामुळे तो सामना विश्वचषकाचाच नव्हे, बीसीसीआयने आयोजित केलेलाही नव्हे तर, गुजरात क्रिकेट संघनटेचा एखादा ‌‘इव्हेन्ट’ वाटत होता. या विश्वचषकाच्या वेळी आयसीसी आणि बीसीसीआय यांनी फार मेहनत घेतली होती, असे वाटलेच नाही. कारण, स्पर्धेचा संपूर्ण फोकस भारत-पाकिस्तान सामन्यावरच केंद्रित करण्यात आला होता. दहा संघांच्या विश्वचषकाच्या 45 सामन्यांपैकी सर्वांचे लक्ष फक्त भारताच्या सामन्याकडेच लागले आहे. अन्य दर्जेदार संघांची किंवा खेळाडूंची प्रसिद्धीच करण्यात आली नाही.

सामन्यांच्या तिकिटविक्रीबाबत यंत्रणा तर भारतीयांच्या मनातूनच उतरली. जाहीर केल्यानंतर संकेतस्थळावर तिकिटांसाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या पदरी निराशाच आली. मुळातच, अशा संस्थांमार्फत तिकिटविक्री करताना त्यात पारदर्शकता असायला हवी होती. या यंत्रणेमुळे या विश्वचषकात आपल्याला तिकिटे मिळणारच नाहीत, असा क्रिकेटरसिकांचा समज दृढ झाला. त्यामुळे दर्दी क्रिकेटप्रेमींनी तर प्रत्यक्ष सामन्यांकडे, स्टेडियमकडे पाठ फिरविली. मूळ हमितीत फार कमी ठिकाणी तिकिटे उपलब्ध होती. काळ्या बाजारातील तिकिटे मात्र चढ्या भावात मिळत होती. मुळातच प्रत्येक आयोजक, आयोजन व्यवस्था यांनीच तिकिटे आपल्या नियंत्रणासाठी ठेवली. आयसीसीचा कोटा, बीसीसीआयचा कोटा, यजमान क्रिकेट केंद्राच्या संघटनेचा कोटा, या सर्वांनंतर अत्यल्प तिकिटेच विक्रीसाठी होती. या तिकिटविक्रीपेक्षा थेट प्रक्षेपण हक्क, पुरस्कर्ते आणि जाहिरातदार यांच्यामार्फत प्रचंड पैशाचा मलिदा मिळाल्यानंतर सर्व आयोजन संस्थांना माज, सुस्ती आली नसती तरच नवल होते. क्रिकेटचे काय भले-बुरे होतेय याचा सारासार विचार करायला त्या सर्वांकडे वेळ कोठेय!

Email:- vinayakdalvi41@gmail.com

Exit mobile version