ठेकेदाराकडे खंडणी मागणार्‍यावर गुन्हा

। धाटाव । वार्ताहर ।

गावाला पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनचे काम व्यवस्थित नाही. म्हणून तुमच्या बद्दल बदनामीचा मजकूर लिहून तो पेपरला प्रसारित करतो अशी धमकी देत ठेकेदाराकडे वेळोवेळी पैसे स्वरूपात खंडणी मागणार्‍या लोकशाही यु ट्यूब न्यूज चॅनल संपादक राकेश येलकर याच्यावर रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान सोशल मीडियाच्या दुनियेत सध्या यु ट्यूब चॅनलने अधिक भरारी घेतली असली तरी रोह्यात विशेषतः ग्रामीण भागात बोगस चॅनलच्या पत्रकारांनी मांडलेले उच्छाद या प्रकरणावरून समोर आले आहे. यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून खंडणी वसुलीचे अनेक प्रकार देखील घडले आहेत. मात्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्या बोगस पत्रकारांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

राकेश गणेश येलकर असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तो लोकशाही यु-ट्युब न्यूज चॅनेल व पोर्टलचे पत्रकार,संपादक म्हणून काम करत आहे. रविवार (दि. 4) रोजी 11:30 वाजता तालुक्यातील धानकान्हे गावाला पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनचे काम सुरू असताना आरोपी याने मी लोकशाही यु ट्यूब चॅनलचा संपादक असे भासवून फिर्यादी सूरज कचरे यांना तुम्ही केलेल्या पाईपलाईनचे काम व्यवस्थित नाही. अशी बातमी पेपरला प्रसिद्ध करतो अशी भीती दाखवून धमकी देत वेळोवेळी पैसे स्वरूपात खंडणी मागाणी केली. फिर्यादी कचरे यांच्याकडून आरोपी येलकर याने आतापर्यंत 9 हजार रुपये गुगल पे द्वारे स्वीकारले आहेत. तरी देखील आरोपीकडून अधिक रकमेची मागणी सुरूच आहे. आरोपीने फिर्यादीकडे पैशांची मागणी केल्याने राकेश येलकर याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार आहे. तर रोह्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.आर.रावडे यांच्यासह सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version