राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष भुसाणेंनी लुटले करोडो रुपये; गुन्हा दाखल

। दिघी । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन शहरातील सर्व सामान्य व्यक्तींची करोडो रुपयाची लुबाडणूक करणार्‍या जनसेवा नागरिक सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक तथा माजी नगराध्यक्ष नरेंद्र उर्फ आप्पा भुसाणे यांच्यासह अन्य आठजणांविरुद्ध श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसाणे हे राष्ट्रवादीचे नेते असून, आतापर्यंत राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेनंतर ते फरारीच होते. मात्र,आता सत्ता बदलताच भुसाणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला दणका बसल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आता या प्रकरणाचा छडा लागेल असा विश्‍वास ठेविदारांना वाटू लागला आहे.

नरेंद्र भूसाणे याच्यासह सचिन कोसबे,सुप्रेश दवटे,संदेश सावंत, चेतन गुरव,पराग चैगुले, स्पप्नील भुसाणे, सिद्धेश भुसाणे.सर्व रा.श्रीवर्धन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. श्रीवर्धन येथील जनसेवा पतसंस्थेतच्या लेखाकार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 1 जानेवारी 2011 ते दिनांक 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये पतसंस्थेंच्या व्यवस्थापकांनी पदाचा दुरुपयोग करून पतसंस्थेमधील सभासदांचा विश्‍वासघात करीत जमा होत असलेल्या चार करोड दहा लाख 17 हजार 300 46 रुपये. 66 यांचा अपहार केला आहे.

लेखाकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 91/2022 भारतीय दंड विधान कलम 420 34 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

जनसेवा पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने गैरप्रकार केल्याचे समजल्यानंतर सन 2019 मध्ये पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतली होती . सदर प्रसंगी जनसेवा नागरी पतसंस्थेच्या कार्यालयाच्या बाहेर ठेवीदारांनी भुसाणे यांना घेराव घातला होता.मात्र 2019 पासून जनसेवा नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.जनसेवा नागरी पतसंस्थेमध्ये श्रीवर्धन येथील अनेक गोरगरीब लोकांचे पैसे (गुंतवणूक) अडकून पडलेले आहेत.

Exit mobile version