| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील इतर प्रकल्पात काम करणाऱ्या एका 25 वर्षीय मजुराने विमानतळ परिसराच्या पूर्व बाजूच्या कुंपणावरून आत उडी मारून विमानतळाच्या धावपट्टी व नियंत्रण कक्षाजवळील परिसरात वावर केला. यामुळे त्याच्यावर थेट पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला. विना परवानगी प्रवेश करून चोरीच्या उद्देशाने विमानतळात प्रवेश केल्याचा ठपका त्या मजुरावर ठेवण्यात आला आहे. सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदविली. या मजुराला कामावरून काढून टाकले असून तो धावपट्टी व नियंत्रण कक्षाजवळील प्रवेश नसलेल्या ठिकाणी का गेला?, याची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक सारीका झांजुर्णे व पथक करत आहेत.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे या मागणीसाठी 22 डिसेंबरला आंदोलन केले जाणार आहे. दिबा यांचे नाव विमानतळाला देत नाहीत तोपर्यंत विमान उडू देणार नाही, असा इशारा देण्यात येत असल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षेसाठी नेमलेले सीआयएसएफ आणि स्थानिक पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आंदोलकांचा जत्था विमानतळाच्या बाहेरील एक किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचू नये असे नियोजन पोलीस विभागाकडून केले जात आहे.







