जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
| अलिबाग | प्रतिनिधी |
शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे तणनाशके विक्रीचा धंदा चालविला जात होता. मात्र, अनधिकृत तणनाशके विक्री करणे विक्रेत्याला महागात पडले. रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकातील मोहीम अधिकारी तथा गुणनियंत्रक निरीक्षक यांनी बुधवारी (दि.11) कारवाई करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या या कारवाईने बेकायदेशीर विक्री व्यवसाय चालविणाऱ्यांना दणका मिळाला आहे.
जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतं पाण्याने भरली गेली. खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्रीची एकूण 611 दुकाने आहेत. जिल्ह्यात पूर्वहंगामी पावसामुळे तण मारण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात तणनाशके खरेदी करत आहेत. जिल्ह्यात रोहा तालुक्यातील समर्थनगर आंबेवाडी-कोलाड येथे एक इसम विनापरवाना अनधिकृत तणनाशके विक्री करत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाला मिळाली. जिल्हा मोहीम अधिकारी महेश नारायणकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पथकातील जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी बुधभूषण मुनेश्वर यांनी ग्राहक म्हणून संबंधित दुकानाला भेट दिली. त्यावेळी अनधिकृत तणनाशके विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. कृषी विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी एकत्रित त्या दुकानात छापा टाकला. धनाजीभाई लाखभाई कातरिया या दुकानदाराची चौकशी करण्यात आली. तपासणीमध्ये एका कंपनीचे 41 टक्के तणनाशके अनधिकृत विक्री करीत असल्याचे आढळून आले.
कीटकनाशक अधिनियम 1968 नुसार शेतकऱ्यांना परवानाशिवाय कृषी औषधांची विक्री करणे गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तसेच मानवी आरोग्य व पर्यावरणाचे नुकसान होते. विक्रेत्याने कीटकनाशक अधिनियमाचे उल्लंघन केल्यामुळे जिल्हास्तरीय भरारी पथकातील मोहीम अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक जिल्हा परिषद महेश नारायणकर, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक बुद्ध भूषण मुनेश्वर यांच्यासह त्यांच्या पथकाने कृषी संचालक आयुक्तालय पुणे, विभागीय कृषी सहसंचालक ठाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. धनाजीभाई लाखभाई कातरिया या विक्रेत्यावर कोलाड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.10) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून दोन लाख 68 हजार 800 रुपये किमतीच्या एक लीटरच्या 180 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
कृषी रसायने वापर अधिकृत नियमानुसार केल्यास मानवी आरोग्य व पर्यावरणाचे होणारे संभाव्य धोके टाळता येतात. शेतकऱ्यांनी कोणतीही कृषी निविष्ठा खरेदी करताना कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता गुणवत्तापूर्ण व योग्य असल्याची खात्री करूनच विक्रेत्याकडून पक्की पावती घेऊन अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत. त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल. अनधिकृत बोगस कृषी निविष्ठा कीटकनाशके, तणनाशके, खते, बियाणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ 7588020519 व 9503917278 या क्रमांकावर कृषी विभागास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन व मोहीम अधिकारी महेश नारायणकर यांनी केले आहे






