कडसुरे सरपंचावर होणार फौजदारी गुन्हा

शीतल पुंड यांचे ग्रामस्थांना आश्‍वासन
पाणीपुरवठा योजनेतील अपहार भोवणार
कडसुरे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

वाकण | वार्ताहर |
नागोठण्याजवळील कडसुरे (ता. रोहा) येथील नळ पाणीपुरवठा योजनेत केलेला भ्रष्टाचार व योजनेतील पैशांचा अपहारप्रकरणी योजनेचे अध्यक्ष असलेल्या व संबंधित विद्यमान सरपंचांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन सरपंचपदावरून काढण्यासाठी कडसुरे ग्रामस्थांकडून बुधवार, दि. 30 जून रोजी रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर करण्यात येणारे उपोषण राजिपच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांच्याकडून संबंधितावर कारवाई करण्याच्या लेखी आश्‍वासनानंतर कडसुरे ग्रामस्थांकडून स्थगित करण्यात आले आहे.

मात्र, त्याचवेळी जर याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर येत्या काही दिवसांत विनाविलंब कारवाई करण्यात आली नाही किंवा कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात आली, तर पुन्हा नव्या जोमाने अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असेही कडसुरेतील उपोषणकर्ते ग्रामस्थ महेश शिंदे, दिलीप शिंदे, पांडुरंग शिंदे, संदीप शिंदे, दत्तात्रेय शिर्के व काशीराम गव्हंडकर यांनी स्पष्ट केले आहे.

याप्रकरणी राजिपच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांच्याकडून कडसुरे ग्रामस्थांना मंगळवार, दि. 29 जून रोजी उपोषण मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या विनंती पत्रात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कडसुरेच्या पाणी व स्वच्छता समितीचे अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच यांच्याविरूद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39(1) नुसार पुढील कारवाई करण्याबाबत कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडे राजिप कार्यालयातून जा.क्र. 13309 दि. 24/06/2021 अन्वये अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी संबंधितावर कधी व कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण नागोठणे विभागाचे लक्ष लागले आहे.

कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडून पुढील आदेश प्राप्त होताच कडसुरे ग्रामपंचायतीच्या संबंधित सरपंचाविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप

Exit mobile version