तालुक्यातील एक शिक्षकी शाळांवर संकट

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

विद्यार्थी वाऱ्यावर; बहुजन विद्यार्थी संघटनेचा इशारा

| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा या एक शिक्षकी शाळा म्हणून कार्यरत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे या शाळांमधून शिक्षक कमी झाले असून, काही शाळा पूर्णपणे शिक्षकांविना सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी मार्गदर्शनाविना वाऱ्यावर पडले असून, तालुक्याची शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

यासंदर्भात बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे. एकमेव शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळणे कठीण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सुधागड हा अतिदुर्गम भाग असून, येथे शिक्षण क्षेत्रात अपेक्षित प्रगती झालेली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षक न मिळाल्यास शिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे. तातडीने या शाळांवर पूर्णवेळ शिक्षकांची नेमणूक करावी, अन्यथा बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

Exit mobile version