राज्यावर पुन्हा भारनियमनाचे संकट

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले संकेत
। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र राज्यावर पुन्हा एकदा भारनियमनाचे संकट असल्याचे संकेत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यात एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा औष्णिक वीज उत्पादन केंद्रांमध्ये शिल्लक असल्याने उत्पादन वीजेची निर्मिती घटण्याची शक्यताही नितीन राऊत यांनी व्यक्त केली. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत दोन दिवसांच्या अकोला जिल्हा दौर्‍यावर आहेत. दरम्यान, त्यांनी वीज केंद्रांचे लोकार्पण केल्यानंतर प्रसारमाध्यमांसह संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, उन्हाळा सुरू झाल्याने विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्या तुलनेत वीज उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक तेवढा कोळसा वीज उत्पादन केंद्रांकडे उपलब्ध नाही. वीज उत्पादन घटल्यास राज्यात भारनियमन करावे लागू शकते. याशिवाय कोळशासाठी सातत्याने संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहोत. मात्र, परिस्थितीत बदल न झाल्यास भारनियमन अटळ असल्याचेही ते म्हणाले आहेत.

महावितरणला पैसे देऊन बाहेरून वीजखरेदी करावी लागते. करोना काळात सर्वत्र टाळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठा करण्यात आला. करोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले हे मान्यच. पण, वीज वापरली असेल तर देयकाचे पैसे भरावेच लागतील – उर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य

Exit mobile version