क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर राजकीय मैदानही गाजवून पाकिस्तानाचे थेट पंतप्रधान बनलेले इम्रान खान आता संकटात सापडले आहेत. त्यांच्या सत्ताधारी आघाडीतील एक महत्त्वाचा घटक पक्ष बुधवारी विरोधकांना जाऊन मिळाला आणि गेले काही दिवस अडचणीत असलेल्या इम्रान खान यांची त्यावर मात करण्याची आशा संपुष्टात आली. कारण, त्यांनी बहुमत गमावले आहे. विरोधी पक्षांनी तेथील नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांच्याविरुद्ध आणलेल्या अविश्वास ठरावाचे आव्हान त्यांच्यापुढे होते. पाकिस्तानमधील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीसाठी इम्रान खान यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत हा अविश्वास ठराव आणण्यात आला होता. त्यात पराभूत होण्याचे संकट इम्रान खान यांच्यापुढे उभे ठाकले होते. तीन एप्रिल रोजी हा ठराव येणार होता. त्यापूर्वीच इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-इ-इन्साफ या पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधील एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या मुत्तहिद कौमी मूव्हमेंट या पक्षाने आपण आघाडीशी संबंध तोडल्याचे जाहीर करत राजधानी इस्लामाबादमध्ये विरोधी पक्षांसोबत मांडीला मांडी लावून बसल्याने सत्ताधारी आघाडी अल्पमतात आली आहे. त्यांचे सात सदस्य असले तरी बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे ते इम्रान खान यांना आपले सरकार तारण्यासाठी मोलाचे होते. पंतप्रधान खान यांना विरोधी पक्षांच्या अविश्वास ठरावावर मात करण्यासाठी 172 मतांची आवश्यकता आहे. कारण एकूण सदस्यसंख्या 342 आहे. सध्या विरोधकांकडे 175 सदस्य असल्याने पंतप्रधान इम्रान खान यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली जात आहे. इम्रान खान यांना पदावरून हटवल्यानंतर विरोधी पक्षांनी आपले नेते पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (पीएमएल-एन) या पक्षाचे शहबाझ शरीफ हे पुढील पंतप्रधान होतील, असे जाहीरही करण्यात आले आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावावर तीन एप्रिल रोजी मतदान होणार असले तरी तेव्हा त्यांना पाठिंबा देणार्यांपेक्षा त्यांच्या आघाडीतून बाहेर पडलेले विविध पक्ष इम्रान खान यांच्याविरोधात अधिक मतदान करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. इम्रान खान पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या ग्लॅमरचा आणि आधुनिक दृष्टीकोनाचा विजय असे चित्र उभे केले गेले तरी, त्यांचे राजकीय यश लष्कराच्या बळावर अथवा छुप्या पाठिंब्यावर असल्याचे अनेक अभ्यासक, पत्रकारांनी तेव्हा म्हटले होते. अलिकडच्या काळात लष्कराची खप्पामर्जी झाल्याने ते एकाकी होत असताना विरोधकांनी हा नेमक्या वेळी डाव साधून त्यांना कोंडीत पकडले आहे. पाकिस्तानातील बिघडलेल्या आर्थिक स्थितीचे वृत्त सातत्याने येत होते. पाकला वारंवार कर्जासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाण्याची वेळ आली होती. तसेच, त्याने चीन आणि सौदी अरेबिया यासारख्या मित्रराष्ट्रांकडूनही मिळेल तितके कर्ज पदरात पाडून घेत दिवस ढकलले होते. गेल्या अनेक महिन्यांच्या आर्थिक अराजकतेविरोधात हा ठराव आम्हा सर्व विरोधी पक्षांनी मांडलेला आहे, असे विरोधक सांगतात. त्यासाठी ते खान यांच्या कारकिर्दीतील साडेतीन वर्षांत चलनवाढ दहा टक्क्यांंहून अधिक झाली, हे वास्तव मांडत आहेत. एकेकाळी कसोटी क्रिकेटचे स्टार असलेले इम्रान खान शेवटच्या चेंडूपर्यंत खेळेन आणि काही तरी चमत्कार घडवून आणीन असे म्हणत आहेत. मात्र देशाचा आर्थिक विकास दर साडेतीन टक्क्यांच्या पुढे जायला तयार नाही आणि कर्जाचे प्रमाण वाढण्यावर मर्यादा आहेत. शिवाय, आधी घेतलेल्या कर्जावरील व्याज परताव्याची स्थितीही नाजूक आहे. त्यामुळे नवीन कर्ज घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सौदी अरेबिया हा मुस्लिम देश आहे आणि पाकिस्तानही इस्लामी देश आहे, त्यामुळे पूर्वीप्रमाणे आताही तो मदत करेल असा तर्क कोणीही लावेल. अखेर पैसा हा पैसा असतो, त्याची भरपाई करावीच लागते. त्यानुसार सौदीनेही त्याने आतापर्यंत दिलेल्या कर्जाची व्याजासह वसुली करण्याचे ठरविल्याचे वृत्त आहे. या सर्व स्थितीत आधीच भारतद्वेषापोटी चीनला शरण गेलेल्या आणि आणि अफगाणिस्तानवर नियंत्रण आणण्याच्या आणि त्यालाही चीनचा अंकित बनवण्याच्या अट्टाहासापोटी पाकने चीन, अफगाणिस्तान व पाकिस्तान असा कथित दबावगट निर्माण केला तरी जनतेला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न काही सुटलेला नाही. त्यामुळे इम्रान खान यांच्यापुढे असलेले हे पाकिस्तानच्या समस्यांचे संकट सोपेपणाने सुटण्यासारखे नाही. येत्या काही दिवसांतील घडामोडी पाकिस्तानला वेगळी दिशा देणार्या ठरू शकतात. किंवा राजकीय चमत्कार होऊन ते संकटावर मात करू शकतात. ते वाचले तरी संकट कसे दूर होईल, या प्रश्नाचे उत्तर काळच देऊ शकेल.
इम्रानवर पाकसंकट

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026