राज्यावरील अस्मानी संकट भयानक

पूरग्रस्त गावांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावणार
कोल्हापूर दौर्‍यात मुख्यमंत्र्यांचं आश्‍वासन
कोल्हापूर | वृत्तसंस्था |
राज्यावर ओढावलेलं यंदाचं अस्मानी संकट हे भयानक आहे, दरडीखाली लोक गाडले गेले. रस्ते वाहून गेले, खचले. या संकटातून बाहेर पडताना आपले प्राधान्य जीव वाचवण्याला आहे. कायम पुराचा धोका असणार्‍या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लावू, पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून, याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह अन्य अधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होते.
नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्त स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी 2019 चा पूर, सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून, याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थानचे पदाधिकारी यांनी केली.
पंचगंगा, सावित्री, जगबुडीचे पाणी वाढले की नदीकाठच्या लोकांना स्थलांतर करावे लागते. आता धरणातून बाहेर सोडल्या जाणार्‍या पाण्याचे नियोजन कसे करायचं ते पाहावं लागेल. याशिवाय कोसळणार्‍या दरडी, खचणारे रस्ते यासाठी भूगर्भाचा अभ्यास करून नियोजन करण्यात येईल.
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आजी-माजी सीएम आमनेसामने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौर्‍यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. जिथं मुख्यमंत्री येणार आहेत, तिथेच फडणवीसदेखील पोहोचले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही एकाच ठिकाणी शाहुपुरीत भेटले. वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूया, असा फोन उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना गेला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करून शाहुपुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकत्र पाहणी झाली.

Exit mobile version