वीस गुंठे जागा बांधकामासाठी देण्यात आल्याची माहिती उघड
| रायगड जिल्हा | प्रमोद जाधव |
अलिबाग-रोहा मार्गावरील घोटवडेनजीक उसर येथे 52 एकर जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. या जागेत 50 खाटांचे क्रिटीकल केअर रुग्णालय उभे राहणार आहे. मेडिकल कॉलेजकडून 20 गुंठे जागा बांधकामासाठी देण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून वहिवाटीसाठी जागा मागणाऱ्या स्थानिकांकडे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. तहसीलदारांच्या मागणीलाही केराची टोपली त्यांनी दाखविली आहे.
अलिबाग तालुक्यातील उसर येथे 52 एकर जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचे 2022 मध्ये भूमीपूजन झाले होते. महाविद्यालयाबरोबरच 500 खाटांचे अद्ययावत असे रुग्णालय, ग्रंथालय, वसतिगृह, सुसज्ज असे प्रशासकीय कार्यालय असणार आहे. 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. अखेर चार महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेत 50 खाटांचे क्रिटीकल केअर रुग्णालय बांधण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधीक्षक अभियंता यांनी जागेची मागणी केली. ही मागणी जानेवारी महिन्यात करण्यात आली होती. त्या मागणीची तात्काळ दखल घेत वीस गुंठे जागा देण्यात आली. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत इन्फ्रास्ट्रक्चर योजनेंतर्गत हे रुग्णालय बांधले जाणार आहे.
मात्र, याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीला लागूनच अनेक स्थानिक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी आहेत. या शेतांमध्ये भातशेतीसह फळपिकांची लागवड केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेतूनच शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता पूर्वपरंपरागत आहे. रस्त्यासाठी या जागेचा वापर गेली 50 वर्षांहून अधिक वर्षांपासून आहे. परंतु, महाविद्यालयाच्या कंपाऊंडच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची अवजारे, भात, पेंढा यांची वाहतूक करता येत नाही. शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना शेतावरही जाता येत नाही. वहिवाटीसाठी हा रस्ता खुला करण्यात यावा, असे पत्र अलिबागचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विक्रम पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला डिसेंबर 2024 मध्ये दिले आहे. परंतु, या पत्राची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून दखल घेण्यात आली नाही. मात्र, क्रिटीकल केअर रुग्णालयासाठी वीस गुंठे जागा देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मेडिकल कॉलेजच्या लगतच भातशेती आहे. इतर हंगामात कडधान्य पिकांची लागवड केली जाते. या जागेतून पूर्वपरंपरागत वहिवाटीचा रस्ता आहे. परंतु, मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाकडून अडवणूक केली जात आहे. योग्य रस्ता देण्यास अडथळा केला जात आहे. तहसीलदार यांनी रस्ता खुला करण्याचे पत्र दिले आहे. तरीदेखील त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आराखड्यात नसलेल्या क्रिटीकल केअर रुग्णालयासाठी वीस गुंठे जागा काही महिन्यांत देण्यात आली आहे. पूर्ववत रस्ता खुला करण्यात यावा.
जानकीबाई शिंदे,
शेतकरी
रस्त्यासाठी जागा देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. आगामी काळात रस्ता देण्यात येईल. सध्या तात्पुरत्या स्वरुपात रस्ता सुरू आहे. क्रिटीकल केअर रुग्णालयाचा याबाबत काहीही संबंध नाही.
डॉ. पूर्वा पाटील,
अधिष्ठाता







