रुग्णवाहिकांचे जाळे उभारणार; आरोग्य विभागाकडून प्रस्ताव
| रायगड | पतिनिधी |
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच एमएसआरडीसी, एनएचएआय अशा अनेक संस्थांच्यावतीने रुग्णवाहिका सेवा देण्यात येतात. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित जाळे व संचलन, देखरेख करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. यामुळे अतिगंभीर रुग्णांना महत्त्वांच्या तासांत रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांचे प्राण वाचविण्यासाठी जलद रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.
राज्याच्या रुग्णसेवेत लवकरच नवीन अत्याधुनिक 108 रुग्णवाहिका रुजू होणार आहेत. या सर्व रुग्णवाहिका निर्धारित केलेल्या वेळेत सेवेत रुजू करून आवश्यकतेनुसार ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नवीन अत्याधुनिक 108 रुग्णवाहिकेसोबतच 102, 104, 112 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकाही कार्यरत आहेत. एमएसआरडीसी, एनएचएआय या संस्थांच्या वतीने महामार्गावर, टोल नाक्यावर, रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क तयार केल्यास, रुग्णांना महत्त्वाच्या तासांत जलद रुग्णसेवा उपलब्ध होणार आहे. राज्यातील रुग्णवाहिका सेवावर महाराष्ट्र शासन असे स्पष्ट लिहिले असावे. कोणत्याही कंपनीचे नाव किंवा चिन्हे वापरू नये. पुरवठादार संस्थेने, रुग्णवाहिकेवर आपल्या कंपनीची नव्हे तर महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असल्याचे नमूद करावे. शासकीय अधिकाऱ्यांच्या मान्यता घेऊनच रुग्णवाहिकेवरील ब्रँडिंग करावे, अशा स्पष्ट सूचना आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा गतिमान करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असून याचाच एक भाग म्हणून आगामी काळात तब्बल 1700 नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 872 कोटी रुपये खर्च येणार असून यातील 49 टक्के रक्कम आरोग्य विभाग तर उर्वरित 51 टक्के रक्कम ज्या संस्थेच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका सेवा चालवण्यात येणार आहे त्यांनी खर्च करावयाची आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच एमएसआरडीसी, एनएचएआय, अशा अनेक संस्थाच्या वतीने रुग्णवाहिका सेवा देण्यात येतात. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क व संचलन, मॉनिटरींग करण्याचा प्रस्तावही आरोग्य विभागाच्या विचाराधीन आहे. सध्या आरोग्य विभागाअंतर्गत 108 रुग्णवाहिकेसोबतच 102, 104 व 112 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकाही कार्यरत आहेत. नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या सतराशे रुग्णवाहिकांमध्ये काही रुग्णवाहिका या नवजात अर्भकांसाठी असतील तर नंदुरबारसारख्या भागाचा विचार करून बोट रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत.
