पेणमधील ठाकरे गटाच्या संवाद यात्रेत खरपुस समाचार
| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे असलेल्या गद्दाराला पाडण्याचे आदेश खुद्ददस्तुर पवार साहेबांनी दिले आहेत. भाजपला जर घराणेशाही नको असेल तर त्यांनी जाहीर करावं की रायगडातील खासदार, माजी पालकमंत्री यांना तिकीत देणार नाही. राज्यसभेत तटकरेंना घेणार नाही, त्यांना गेटआउट करू. पण हे त्यांना जमणार नाही. मात्र, रायगडची जनता सुज्ञ आहे. रायगड हा मोदी लाटेविरोधात, हुकूमाशाहीविरोधात लढणारा जिल्हा आहे. त्यामुळे रायगडकर गद्दारांना घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पेण येथे गुरुवारी (दि.1) आयोजित संवाद यात्रेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील, किशोर जैन, माजी आ. मनोहर भोईर, बबनदादा पाटील, महादेव दिवेकर, स्मिता पाटील, सुरेंद्र म्हात्रे तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेण येथे संपन्न झालेल्या शिवसेनेच्या कोकणातील पहिल्या संवाद यात्रेला संबोधीत करताना उध्दव ठाकरे यांनी मोदी आणि सुनिल तटकरे यांचा खरपुस समाचार घेतला. आपल्या ठाकरे शैलीचा बाणा पेणकरांना दाखवत ते पुढे म्हणाले की, रायगडकरांना विशेष करून धन्यवाद द्यायचे आहे. कारण मागील मोदी लाटेत हा जिल्हा मोदींबरोबर वाहत गेला नाही. तर मोदी लाटेला विरोध केला. मात्र, जो निवडून आला तो मोदींसोबत गेला. मोदी या व्यक्तीला विरोध नसून त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला विरोध आहे. रायगडकर कायम हुकुमशाही विरोधात उभे राहिले आहेत. त्यामुळे रायगडमध्ये मोदींची हुकुमशाही गाढली जाईल, याची पुर्ण खात्री आहे. मागच्या निवडणूकीत रायगडकरांनी ताठ मानेने मोदींच्या विरोधात मतदान केले होते. यावेळी मोदींविरोधात, हुकूमशाहीविरोधात त्सुनामीसारखे मतदान होईल.
मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प देशातला मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केला आहे. सीतारमण म्हणाल्या की, यापुढे देशात गरीब, महिला, तरुण व शेतकरी चार जातींसाठी काम करणार. त्याबद्दल आभार. मात्र या चार जाती आत्ता कशा आठवल्या. मणिपुरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, थंडी, वाऱ्यात शेतकऱ्यांना जवळपास दीड वर्ष आंदोलन करावं लागलं, त्यांना अतिरेकी ठरविलं, तेव्हा या चार जाती का नाही आठवल्या? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. हा सगळा भूलभुलैया आहे. हे थोटांड आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे.
रायगडचे सातही आमदार इंडिया आघाडीचेच या सभेला संबोधत असताना अनंत गीते यांनी 20 ते 22 खासदार इंडिया आघाडीचे महाराष्ट्रात येणार, असे भाकीत केले. तर मावळ आणि रायगडची बाजी ही शिवसेनाच मारेल, असे सांगत रायगडचे सातही आमदार हे इंडिया आघाडीचेच असतील, असे ठामपणे सांगितले.
महाराजांबरोबर मोदींची तुलना करू नये तुम्ही देव मानत असाल, तर माना, पण मोदींची छत्रपतींशी तुलना करणारे निर्बुद्ध, बिनडोक आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोविंदगिरी महाराजांवर केला आहे.
ही भाड्याने आणलेली जनता नाही मोदी यांच्या थापा तुम्ही लोकांना सांगा, प्रचंड पैसा जाहिरातीवर खर्च केला आहे. जनसंवाद माझा नाही तुम्ही एकमेकात संवाद करा आणि जनतेसमोर सत्य येऊ द्या. सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी आता तुमची आहे, असे ते अनंत गीते यांना म्हणाले. रायगड जिल्हा हा हुकूमशाहीविरोधात लढणारा जिल्हा आहे. ही भाड्याने आणलेली जनता नाही, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले.