तिजोरीत 45 कोटी; 50 टक्के सवलत ठरली सुपरहिट
| रायगड | प्रमोद जाधव |
परवडणारी आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांसाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत लागू केली. महिला सन्मान योजनेअंतर्गत ही सेवा देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 मध्ये एका वर्षात दोन कोटी दोन लाख 20 हजार 694 महिलांनी एसटीतून प्रवास केला. यातून एसटीला 45 कोटी 22 लाख 60 हजार 338 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात जिल्ह्यामध्ये करोडोची भर पडल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
पावसाळ्यात एसटीच्या छताला गळती, सतत बंद पडणे, एसटी बस वेळेवर न लागणे अशा अनेक कारणांमुळे एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. अनेक प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत त्यांच्या निश्चितस्थळी पोहचण्याकडे भर देत होते. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट होण्याचे संकट निर्माण झाले होते. एसटी तोट्यात जाऊ लागली. एसटी बद्दल प्रवाशांना आकर्षण निर्माण व्हावे, एसटीतील प्रवासी टीकून राहवे, यासाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत. या योजनांद्वारे प्रवासी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे एसटी महामंडळाने खास महिलांसाठी महिला सन्मान योजना सुरु केली. ही योजना 17 मार्च 2023 पासून सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना तिकीटाच्या निम्म्या दरात प्रवास करण्याची सोय केली. साध्या बसपासून निम आराम, शिवशाही अशा अनेक बसमधून कुठेही प्रवास करताना तिकीट भाड्यात 50 टक्के सूट देण्याची व्यवस्था करण्यात आली. सुरक्षीत आणि परवडणारी सेवा देण्याचा उद्देश महामंडळाने सुरु केला.
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, पेण, कर्जत, महाड, माणगाव, श्रीवर्धन, मूरूड, रोहा असे आठ आगार असून 19 बस स्थानके आहे. पेण तालुक्यातील रामवाडी येथील विभाग नियंत्रक सुनील चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कारभार चालत आहे. जिल्हयातील 400 हून अधिक एसटी बसेस आहेत.
महिला सन्मान योजनेअंतर्गत जानेवारी ते डिसेंंंबर 2025 या 12 महिन्याच्या कालावधीत 2 कोटी 2 लाख 20 हजार 694 महिलांनी एसटीतून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीत एसटीला 45 कोटी 22 लाख 60 हजार 338 रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या योजनेचा एसटीला चांगला फायदा झाल्याचे दिसून आले आहे.
2023 पासून सुरु झालेल्या या योजनेला रायगड जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 50 टक्के तिकीट दरातून कुठेही निश्चित स्थळी जाण्याची संधी एसटी महामंडळाकडून मिळाली. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील महिलांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. नोकरी व्यवसायासह काही कामानिमित्त तालुका जिल्हा व अन्य जिल्ह्याच्या ठिकाणी निम्म्या दरात प्रवास करण्याची संधी मिळाली. वाट पाहीन पण एसटीने जाईन या भुमिकेतून महिलांनी एसटीतून प्रवास करण्यावर भर दिला.
ज्येष्ठ नागरिकांकडून पसंती
एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील योजना सुरु केली आहे. 65 ते74 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी निम्या दरात प्रवास करण्याची संधी दिली आहे. या वयोगटातील 17 लाख 69 हजार 619 ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. यातून एसटीला चार कोटी 26 लाख 46 हजार 460 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच 75 व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरु केली. ही मोफत व अमर्यादीत प्रवासाची सुविधा सुरु केली. या योजनेचा 24 लाख 30 हजार 251 ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. यातून एसटीच्या उत्पन्नात 12 कोटी चार लाख 45 हजार 216ची वाढ झाली असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
4 लाख प्रवाशांचा विना थांबा प्रवास
वाढत्या वाहनांसह खड्डेमय रस्त्यांमुळे अलिबागहून पनवेलला जाण्यासाठी प्रवाशांना दोन ते अडीच तास लागतो. एसटी सर्वच थांबे घेत असल्याने प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहचता येत नाही. त्यामुळे महामंडळाने विना थांबा सेवा सुरु केली आहे. अलिबाग -पनवेल-अलिबाग ही विना थांबा सेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. शिवशाही या वातानुकूलित बसमधून अवघ्या दीड ते पावणे दोन तासात थेट पनवेलला पोहचता यावे यासाठी ही सेवा सुरु केली आहे. विना थांबा सेवेसाठी येता जाता प्रत्येकी 35 फेऱ्या असून यातून एका वर्षात आठ लाख 45 हजार 184 प्रवाशांनी विना थांबा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.
