मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद
| पनवेल | प्रतिनिधी |
मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दि.18 ते 20 सप्टेंबर या कालावधीकरीता ‘अभय योजना’ विविध टप्प्यामध्ये लागू केली आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घेऊन आपला मालमत्ता कर पुर्ण भरावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी केले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. अवघ्या चार दिवसांत पालिकेच्या तिजोरीत 13 कोटी 16 लाख मालमत्ता कर जमा झाला आहे.
येत्या काळामध्ये महानगरपालिकेने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. विविध विकास कामांमध्ये प्रस्तावित कामांमध्ये नवीन मुख्यालय बांधणे, मच्छी मार्केट, बहुमजली वाहनतळ, शाळा, दैनिक बाजार, प्रभाग कार्यालये, ‘हिरकणी’ हे माता व बाल संगोपन रूग्णालय व सर्व समावेशक असे 450 बेडचे हॉस्पीटल उभारत आहे. या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
शास्ती सवलत अभय योजना
थकीत मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देण्याबाबत अभय योजनेमध्ये चार महत्वाचे टप्पे आहेत. यामध्ये प्रामुख्याने 18 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत संपुर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये 90 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे मालमत्तांधारकांनी या संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर आपला पुर्ण मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच, 16 ते 31 ऑगस्ट या कालाधीत संपुर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये 75 टक्के सूट मिळणार. या पुढील काळात म्हणजे 1 ते 10 सप्टेंबर कालावधीत संपुर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये 50 टक्के सूट मिळेल. आणि 11 ते 20 सप्टेंबर या कालाधीत संपुर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास असलेल्या शास्तीमध्ये 25 टक्के सूट मिळणार आहे. ही अभय योजना केवळ एकवेळची विशेष आणि अंतिम बाब म्हणून जाहीर करण्यात आली आहे.







