| पनवेल | प्रतिनिधी |
एक ग्राम सोने घेऊन 1600/- रुपयांचा नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने पनवेलमधील डी.एम. कोठारी ज्वेलर्सने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी डी.एम. कोठारी ज्वेलर्सच्या दुकानासमोर निदर्शने करून समोर आणला आहे. तळोजा तसेच पनवेलमधील स्थानिक शेतकऱ्यांनी डी.एम. कोठारी याला अटक करून आम्हाला न्याय द्या, अशी मागणी पोलीस प्रशासनाला केली आहे.
यामध्ये काही जणांचे 15 लाख, तर काही जणांचे 34 लाख रुपये असे एकूण 17 जणांचे 6 करोड 50 लाख रुपये यांच्याकडे गुंतवणूक करण्यात आले. मागील वर्षी जुलैमध्ये डी.एम. कोठारी आपल्या परिवारासह पसार झाल्यामुळे या 17 शेतकऱ्यांनी डी.एम. कोठारी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली. यानंतर कोठारी यांनी वकिलामार्फत जामिनासाठी प्रयत्न केले, मात्र पनवेल न्यायालयात, उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातदेखील त्यांना जमीन मिळाला नाही.
सदर प्रकरण नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी असतानाही एक वर्ष उलटून गेले तरी अद्याप कोठारी यांना अटक झाली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे मिळण्याचा मार्ग दिसत नाही. यावेळी तक्रार दाखल केलेल्या शेतकऱ्यांनी कोठारी यांना तात्काळ अटक करावी आणि अजूनही कोणाचे पैसे त्यांनी बुडविले असतील, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून आपल्या तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन केले.
सन 2023 मध्ये डी.एम. कोठारी यांनी कमिशनच्या नावाखाली पैसे गुंतविण्याचा धंदा सुरु केला. सुरुवातीला त्याने काही जणांना याचे एक ग्राम सोन्याच्या भावाचे पैसे गुंतवणुकीवर 1600 रुपयांचे कमिशन दिले. सदर प्रकार त्याने एक वर्षे व्यवस्थित सुरु ठेवला. पैशाने पैसे वाढत आहेत, यासाठी ज्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला त्यांनी आपल्या मित्रपरिवारासह नातेवाईकांनाही यामध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. ज्यावेळी कोठारी यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली, त्यावेळी कोठारी यांनी पनवेलमधून पळ काढला.
त्यानंतर गुंतवणूक केलेल्या शेकडो नागरिकांपैकी काही शेतकरी एकवटले, मागील वर्षी 19 जुलै 2024 रोजी यातील 17 शेतकऱ्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. सदर प्रकार आर्थिक फसवणुकीचा असल्याकारणाने हे प्रकरण बेलापूर येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्हे शाखेकडे गेले. मात्र, वर्ष उलटूनही अद्याप आरोपीचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नसल्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी डी.एम. कोठारी यांच्या दुकानाजवळ येत निदर्शने करीत आपली कैफियत मांडली.







