पालीच्या जत्रेत कोट्यावधींची उलाढाल

प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात

| पाली | बेणसे |

महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सवाला शनिवारी (दि.10) सुरुवात झाली आहे. पाच दिवस सुरू राहणार्‍या या उत्सवाची सांगता बुधवारी (दि.14) होणार आहे. दरम्यान येथे दिवसभर धार्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.13) गणेश जयंतीला लाखो भाविक बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी दाखल होतील. गणेशोत्सवानिमित्त पालीत मोठी जत्रा भरली असून जत्रेत कोट्यावधींची उलाढाल होईल.

यानिमित्ताने देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यानी दिली. सोमवारी (दि.12) पहाटे काकड आरती, अभिषेक. दुपारी सिद्धकला महिला भजनी मंडळाचे भजन झाले. महिलांसाठी हळदीकुंकू, मंत्रजागर आणि रात्री कीर्तन हे कार्यक्रम झाले. मंगळवारी (दि.13) तुकाराम दैठणकर (पुणे) यांचे सनईवादन, अभिषेक आणि श्रींचा जन्मोत्सव कीर्तन होणार आहे. सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा, महानैवेद्य. पालखी सोहळ्यात पाली शहरातून श्रींची पालखी काढली जाते. ठिकठिकाणी ही पालखी थांबते यावेळी लोक मनोभावे श्रींचे दर्शन घेतात व आरती ओवाळतात. बुधवारी (दि.14)) सकाळी 11 ते 2 महाप्रसाद, रात्री लळीतानिमित्त कुसुम मनोहर लेले हे नाटक, उत्तररात्री लळीत (गुरुवारी पहाटे) असे कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण सोहळ्यात राष्ट्रीय कीर्तनकार हभप संकेतबुवा भोळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, वैभव आपटे, प्रमोद पावगी, विश्‍वास गद्रे, अरुण गद्रे, अमोल साठे, डॉ.पिनाकिन कुंटे यांनी दिली.

Exit mobile version