शासनाचे करोडो रुपये गेले वाया

| उरण | वार्ताहर |
चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बापदेवपाडा, कासवळेपाडा, कोंढीपाडा येथील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी राबविण्यात आलेली एक कोटीची पाणीपुरवठा योजना कोरडीच पडली आहे. त्यामुळे सदर योजनेच्या सहा व्यासाच्या पाईपलाईनमधून पाण्याचा एकही थेंब न आल्याने शासनाचे करोडो रुपये वाया गेले असल्याची बाब समोर येत आहे.

चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीचा विस्तार मोठा असल्याने या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच रमेश डाऊर यांनी शासनस्तरावर अनेक वेळा प्रयत्न केले. तसेच सदर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करावे, अशी मागणी लावून धरली होती. आज प्रशासनाच्या ढिसाळ, नियोजनशून्य कारभारामुळे चाणजेसारख्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना पंधरा ते वीस दिवसाआड पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. तत्कालीन आमदार मनोहर शेठ भोईर व माजी आमदार विवेक पाटील यांनी शासनस्तरावर प्रयत्न करुन पाच वर्षांपूर्वी सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीतून बापदेवपाडा, कासवळेपाडा, कोंढीपाडा येथील रहिवाशांसाठी एक कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली.

सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीतून द्रोणागिरी नोड या परिसरातून चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बापदेवपाडा, कासवळेपाडा, कोंढीपाडा येथे पाईप लाईन टाकण्याचे काम संबंधित ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. परंतु, पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईनमधून पाण्याचा एकही थेंब रहिवाशांना न मिळाल्याने पाण्याचे संकट गडद बनले आहे. एकंदरीत, शासनाचे करोडो रुपये वाया गेले आहेत. याबाबतची माहिती घेण्यासाठी रायगड जिल्हा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना तसेच बापदेवपाडा, कासवळेपाडा, कोंढीपाडा येथील पाणीपुरवठा योजना पूर्वरत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अमिताभ भगत, सरपंच, चाणजे ग्रुप ग्रामपंचायत
Exit mobile version