उन्हेरे गरम पाण्याच्या कुंडावर गर्दी

गुलाबी थंडीत पर्यटक लुटतात आनंद

| पाली | प्रतिनिधी |

पाली येथून दोन किलो मीटर अंतरावर वसलेल्या उन्हेरे गावानजीकच गरम पाण्याचे झरे व विठ्ठल मंदिर या ऐतिहासिक ठिकाणामुळे प्रसिद्ध आहे. हे गरम पाण्याचे कुंड श्रीरामाने बाण मारून स्नानासाठी सीतामाईना हे स्थान तयार करून दिले अशी याबाबतची पुराणकथा सांगितली जाते. या गंधकमिश्रीत उष्णोदक पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार, सांधे दुखी या आजारावर रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते. यामुळे येथे नेहमीच पर्यटक येत असतात. मात्र, सध्या वाढलेली थंडी पहाता येथे येऊन स्नानाचा आनंद पर्यटक घेत आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शालेय सहली देखील या ऐतिहासिक स्थळाला भेट देत आहेत.

जगभरातून अनके पर्यटक सर्व ऋतूमध्ये गरम पाण्याच्या कुंडात स्नानासाठी उन्हेरे येथे येतातच. मात्र, या थंडीच्या दिवसात पर्यटकांची वर्दळ असतेच मात्र पाली शहरातून व उन्हेरच्या आजूबाजूच्या गावातून लोक पहाटे स्नानासाठी येण्यास सुरवात होते. येथे स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र कुंडे असून दुसरा कुंड बाहेरील बाजूस आहे. या दगडी कुंडातील पाणी जास्त गरम असते. या गरम पाण्यात स्नान केल्यास ताजेतवाने वाटते व शरिरातील क्षीणपणा नाहीसा होतो. त्यामुळे दिवसभर मोल- मजुरी करून आलेला किंवा शेतात काम करून थकून आलेला शेतकरी संध्याकाळी येथून स्नान केल्याशिवाय जात नाही.

पाली बल्लाळेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक बाप्पाच्या दर्शनानंतर या गरम पाण्याच्या कुंडात स्नानासाठी येतात. स्नान झाल्यानंतर श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाचा लाभ भाविक घेत आहेत. तसेच हिवाळा सुरू झाला असून शाळेच्या सहली मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशा या औषधी गुणधर्म असलेल्या गरम कुंडच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढत आहे.

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणारे पर्यटक तसेच विद्यार्थ्याचे येणाऱ्या सहली यामुळे सध्या उन्हेरे येथील गरम पाण्याच्या कुंडावर मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे येथील छोटे व्यवसायिक तसेच विठ्ठल रुक्माई मंदिरा समोर फुले हार विकणारे सुकावले आहेत. तसेच विठ्ठल रुक्माई देवस्थान ट्रस्टच्या वतीने येथे येणाऱ्या पर्यटकाची पार्किंग, स्वच्छतागृहची व्यवस्था केलेली आहे.

-शिवराम पवार,
अध्यक्ष, विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्ट, उन्हेरे


Exit mobile version