तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी गर्दी

| अलिबाग | प्रतिनिधी |

दहावी, बारावीच्या निकालानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचीदेखील तहसील कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. त्यामध्ये लाडकी बहिणी योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी महिलांची सुध्दा गर्दी होऊ लागली आहे.

दहावी बारावीच्या निकालानंतर काहींनी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. काहींनी व्यवसायिक शिक्षण घेण्यावर भर दिला आहे. या प्रवेशासाठी जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, उत्पन्नाचा दाखला अशा अनेक प्रकारच्या दाखल्यांची गरज निर्माण झाली आहे. हे दाखले काढण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची धावाधाव सुरु झाली आहे. मुदतीच्या अगोदर दाखले मिळावे यासाठी तहसील, उपविभागीय कार्यालयात सकाळपासून पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

सध्या शेतीच्या कामांची लगबग आहे. मुलांना पुढील शिक्षणासाठी दाखले मिळावे यासाठी शेतकऱ्यांसह नोकरी व्यवसायासाठी असलेले पालक तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी दिसत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या सेतू कार्यालयात दाखल्यांसाठी प्रचंड गर्दी होत आहे. दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे गोळा करून सेतू कार्यालयात जमा करण्यासाठी रांगच रांग दिसून येत आहे. त्यात सरकारने लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांसाठी दीड हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी देखील महिलांची तहसील कार्यालयात गर्दी होऊ लागली आहे. दाखले मिळविण्यासाठी लागणारे कागदपत्रे तलाठी कार्यालयात मिळत असल्याने महिला त्याठिकाणीदेखील धावाधाव करीत आहेत. मात्र, काही तलाठी व कोतवालकडून दाखल्यांसाठी कागदपत्रांची पुर्तता करताना टाळाटाळ होत असल्याची खंत काही महिलांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version