अश्रु अनावर! आबांची अंत्ययात्रा…जनसागर उसळला

शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. आज त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्यात येणार असल्याने पंढरपूर – सांगोला रस्त्यावर त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. तर अंत्ययात्रेला लाखो मतदार, कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून त्यांना अखेरचा लाल सलाम केला.

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवाला सूतगिरणीच्या प्रांगणात त्यांचे चिरंजीव पोपट देशमुख यांच्या हस्ते आबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी रतनबाई, मुलगा चंद्रकांत देशमुख, मुलगी शोभा, नातू डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख व कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
त्यापूर्वी सांगोला शहरातील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती तर दुसर्‍या बाजूला तालुक्यातील सर्वच गावांमध्ये शांतता पसरलेली दिसून आली. शेतकरी, कष्टकरी , मजूर आणि कामगारांचा संघर्ष योद्धा आज अखेरच्या प्रवासाला गेले असल्याच्या भावना उपस्थित जनसमुदायाने व्यक्त केल्या. गेल्या पन्नास वर्षांपेक्षाही अधिक कालखंड त्यांनी दुष्काळी भागासाठी संघर्ष केला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सांगोला तालुक्यातीलचं नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्या लगत असणार्‍या इतर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, आ.शहाजीबापू पाटील, शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील, आ.रणजितसिंह मोहिते- पाटील, आ. गोपीचंद पडळकर, आ. बबनराव शिंदे, आ.समाधान अवताडे, आ.प्रशांत परिचारक, आ. सुमन पाटील, आ.अनिल बाबर, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी खा. राजू शेट्टी, आ. अनिल बाबर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री व आमदार महादेव जानकर, माजी मंत्री राम शिंदे, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मा. आ. दीपक साळुंखे- पाटील, प्रकाश शेंडगे, राजन पाटील, रामहरी रूपनर, नगराध्यक्षा राणी माने, भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, सभापती राणी कोळवले, पृथ्वीराज चव्हाण, भाजप किसान सेलचे शशिकांत देशमुख, कल्याणराव काळे, शिवाजी गायकवाड, बाबूराव गायकवाड, तानाजी पाटील, रफिक नदाफ, प्रा. नानासाहेब लिगडे, मारुती बनकर, डॉ. प्रभाकर माळी, भाऊसाहेब रूपनर, अप्सरा ठोकळे, भरत शेळके, आनंदा माने, वैभव नायकवडी, धैर्यशील मोहिते- पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक ग्रामीण तेजस्वी सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, पदाधिकारी, पंचायत समितीचे सदस्य विविध गावचे सरपंच व कार्यकर्ते तसेच राजकीय, सामजिक, शिक्षण ,सहकार क्षेत्रातील लोक उपस्थित होते.
आबासाहेबांची अंत्ययात्रा निघणार्‍या रस्त्यावर सर्वत्र रांगोळी व फुलांची उधळण करण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी होती. आबासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या अगोदर पार्थिवावरील तिरंगा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आबासाहेबांच्या पत्नी रतनबाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
एसटीतून प्रवास
गणपतराव देशमुख हे 1962 मध्ये प्रथम निवडून आले,1978 आणि 1999साली आबा मंत्री होते, ते नेहमी मुंबईला एस टी बसने प्रवास करीत.आजपर्यंत कोणत्याही आमदार किंवा खासदार यांनी एस टी बसमधील राखीव सीटवर बसून प्रवास केला नाही,पण माजी आमदार देशमुख हे यास अपवाद होते.

Exit mobile version