। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
अश्विन कृष्ण चतुर्थी अर्थात चातुर्मासातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीला मुरुड तालुक्यातील नांदगावच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देवस्थानच्या सेवा मंडळाचे पुजारी महेश गोविंद जोशी व विनायक पुरुषोत्तम जोशी यांनी पहाटे श्री सिद्धिविनायकाची शोडषोपचारे पूजा केली. यानंतर मुरुड तालुक्यातील तसेच मंदीराच्या पंचक्रोशीतील भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. यावेळी संकष्टी निमित्ताने मंदिरासमोरील पटांगणात फुले, हार, पेढे, नारळ, दुर्वा व अन्य साहित्यांची दुकाने विक्रेत्यांनी लावली होती.ऑक्टोबर हिटमुळे दुपारी तुरळक गर्दी होती. मात्र, सायंकाळी यात वाढ झाली होती. रात्री स्थानिक भजनी बुवांनी मंदिरात सुस्वर भजने सादर केली.