| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर महागणपती क्षेत्रात शुक्रवारी (दि.6) संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंदिराची फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती. यावेळी भाविकांनी प्राचीन जागृत श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. पेशवेकालीन मंदिरात प्राचीन महागणपतीची मूर्ती विराजमान आहे. श्रींचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची पहाटेपासूनच सुरुवात झाली होती. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हार, गावठी भाज्या, वाल चवळीच्या शेंगा, स्थानिक कुंभारानी बनविलेली मातीची भांडी तसेच अन्य पदार्थांच्या विक्रीला ग्राहकांनी पसंती दर्शविल्याचे निदर्शनास आले. चिरनेर परिसरातील अनेक रहिवाशांना दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थी निमित्ताने रोजगार मिळत आहे. नेहमीप्रमाणे उरण, पनवेल, पेण, नवी मुंबई येथील भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. तर दिवसभर मंदिरात भजनांचा सूर ऐकायला मिळाला असल्याचे गणपती देवस्थानचे कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले.





