| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी संकष्टी चतुर्थीला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता.
रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, पुणे व राज्यातून पालीत हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. भाविकांची मोठी गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिक यांचा धंदा देखील तेजीत होता. परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले होते. येथील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले सुखावले होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ होती. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून रानभाज्या खरेदी करतांना दिसले. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा सुद्धा चांगला झाला. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. प्रसादालय खुले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
जितेंद्र गद्रे,
अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
सोमवारी संकष्टी चतुर्थीला मोठ्या प्रमाणात भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. भाविकांची वर्दळ असल्याने व्यवसाय देखील चांगला झाला.
नरेश बैकर
व्यावसायिक, बल्लाळेश्वर देवस्थान