हॉटेल व्यावसायिक, दुकानदारांचा धंदा तेजीत; वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम
। पाली । वार्ताहर ।
दिवाळी सुट्ट्यांमुळे अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी होत आहे. सध्या रोज जवळपास पाच हजार भाविक बल्लाळेश्वराचे दर्शन घेत आहे. त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिक व दुकानदारांचा धंदा तेजीत आहे. भाविकांच्या गाड्यांमुळे पालीत वाहतूक कोंडी होत आहे. परंतु, पाली पोलीस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले आहे. मंदिर परिसरास यात्रेचे स्वरुप आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीन चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची आणि खाऊची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड विक्रेते, सरबतवाले, प्रसाद व पेढेवाले आदींचा धंदा चांगला होत आहे.
भरलेली दुकाने व गर्दी यामुळे मंदिर परिसर गजबजलेला दिसत आहे. अनेक भाविक स्वतःची वाहने घेवून येत आहेत. तर काही लक्झरी किंवा खासगी बसेसने येतात. यामुळे पालीतील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. परंतु नाक्या-नाक्यावर तैनात असलेले पोलीस तसेच बल्लाळेश्वर मंदिर ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करित आहेत. पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस योग्य बंदोबस्त ठेवत आहेत.
वाहतूक कोंडी सुटता सुटेना
अरुंद रस्ते, नो एन्ट्रीमधून जाणारी वाहणे, मोठ्या वाहणांची रेलचेल, वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक आदि कारणांमुळे पालीत वारंवार वाहतुक कोंडी होते. सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व बसेस पालीत दाखल होत आहे. अरुंद रस्त्यांमुळे दोन्ही बाजूने आलेल्या वाहनांना जाण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी वाहने अडकून पडून वाहतूक कोंडी होते.