| तळा | प्रतिनिधी |
श्रावण महिन्याच्या तोंडावर येणाऱ्या गटारी अमावस्या निमित्ताने तळा बाजारपेठेतील मच्छी मार्केटमध्ये आज पहाटेपासूनच खवय्यांची मोठी गर्दी दिसून आली. श्रावणात मांसाहाराला बंदी असल्याने शेवटचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी सकाळपासूनच बाजारपेठ गजबजवली होती. पहाटे 6 वाजल्यापासूनच तळा बाजारपेठेतील मच्छी मार्केटमध्ये बोंबील, पापलेट, कोलंबी यासारख्या माशांसाठी रांगा लागल्या होत्या. विक्रेत्यांनी देखील मागणीनुसार साठा वाढवला होता. मच्छी सोबतच चिकन आणि मटण दुकानांसमोरही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक कुटुंबे एकत्र येऊन गटारीचा बेत आखत असल्याचे चित्र होते. यामुळे बाजारपेठेत काही काळ वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली होती. श्रावणात शाकाहार करण्याच्या परंपरेमुळे गटारीला मांसाहार करणाऱ्यांची ही गर्दी दरवर्षी पाहायला मिळते.
तळा मच्छी मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी
