| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील मच्छिमारांच्या होड्या मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असल्यामुळे सध्या मासेमारी जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मासळी सापडत असून, मासळीची आवकही वाढली आहे. त्यातच श्रावण संपून पाच व दहा दिवसांच्या गणरायांचे देखील विसर्जन झाल्यामुळे आता खवय्यांसह चाकरमान्यांच्या उड्या मासळीवर पडत आहे. सध्या मासे मुबलक सापडत असल्यामुळे मासळीचे भाव सुद्धा आटोक्यात आहेत. त्यामुळे स्थानिकांसह गणेशोत्सवानिमित्त गावी आलेले चाकरमानी, पर्यटक व खवय्यांची चंगळ झाली असून, ते मासळीवर ताव मारताना दिसत आहेत.
रायगड जिल्ह्याला तब्बल 240 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे ताजी मासळी सहज उपलब्ध होते. अनेक लोक व पर्यटक खास ताजी मासळी खाण्यासाठी येथे येतात. तर, येथील मासळी मोठ्या प्रमाणात मुंबई व इतर शहरात देखील जाते. पावसाळ्यात जून महिन्यापासून मासेमारी बंद होती. नारळी पौर्णिमेनंतर दर्याला नारळ अर्पण करून मच्छिमारांच्या बोटी समुद्रात गेल्या होत्या. मात्र, दरम्यानच्या काळात वादळी वाऱ्यामुळे बोटी किनाऱ्यावर परतल्या होत्या. सध्या वातावरण अनुकूल असल्यामुळे आता पुन्हा मासेमारी सुरू झाली आहे. त्यामुळे मोठ्या विश्रांती नंतर मासळीची चांगली आवक सुरू झाली आहे. कोळंबी, सुरमई, रावस, टोळ, कर्ली, घोळ व पापलेट आदी माशांना पसंती मिळत आहे. बोंबील, मांदेली, बांगडा असा माशांची सध्या लॉटरी लागत आहे.
श्रावण नुकताच संपला आहे. तसेच, गणरायाचे देखील विसर्जन झाले आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून शाकाहारावर असलेले नागरिक आता मांसाहार करू लागले आहेत. मांसाहारमध्ये मासळीला विशेष पसंती आहे. गणपतीसाठी अनेक चाकरमानी गावी आले आहेत. त्यांचा कल मासळी खाण्यावर अधिक आहे. मासळी देखील मुबलक, ताजी व स्वस्त भेटत आहे. खवय्ये खुश आहेत. परिणामी विक्री सुद्धा चांगली होत आहे.
गौरी मनोरे,
मासळी विक्रेत्या, पेण-पाली
मासळी दर प्रतिकिलो
बोंबील- 200 ते 300 रु. किलो
पापलेट मध्यम- 600 ते 700 रु. किलो
पापलेट मोठे- 1000 ते 1200 रु. किलो
सुरमई, रावस- 700 ते 800 रु. किलो
मांदेली- 150 रु. किलो
लाल कोलंबी- 400 रु. किलो
बांगडा- 300 रु. किलो
हलवा- 600 रु. किलो
टोळ- 400 रु. किलो







