श्री सुवर्णगणेश मुखवट्याच्या दर्शनासाठी भविकांची पसंती
। दिघी । प्रतिनिधी ।
गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असतानाच पर्यटकांना श्रीवर्धन- दिवेआगर ची ओढ लागली आहे. सध्या दिवाळी सणाच्या नंतरच्या डिसेंबर एंडच्या सुट्ट्या संपवण्यासाठी पर्यटक येत आहेत. कोकणातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणांहून पर्यटक कोकणातील विविध ठिकाणची व ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी दाखल होऊ लागले आहेत. पावसाच्या मोसमात बंद असलेले समुद्रकिना-यावरील मजेशीर स्पोर्टस् पुन्हा सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे यासोबतच दिवेआगर येथील प्रसिद्ध श्री गणेश सुवर्ण मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची संख्या वाढली आहे. सुवर्ण गणेशाच्या आगमनाने दिवेआगर पर्यटन आता धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून वाढीस येत आहे. राज्यातील शिर्डी, पंढरपूर, गणपतीपुळे अशा प्रसिद्ध धार्मिक स्थळांचा दर्जा दिवेआगरला प्राप्त होत असल्याने फक्त आठवड्यातील विकेंडला होणारी गर्दी आता नेहमीच अनुभवता येत असल्याचे येथील व्यवसायीक सांगतात. श्रीवर्धन तालुका हे पर्यटनदृष्टया विकसित होत चालले आहे. राजकारणाप्रमाणेच श्रीवर्धन पर्यटनदृष्टयादेखील जगाच्या नकाशावर येत आहे. तसेच तालुक्यातील विविध पर्यटन विकासासाठी कित्येक कोटी निधी आला आहे. श्रीवर्धन तसेच दिवेआगर समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट मध्ये बंपर टयुब राइड, बनाना बोट राइड इत्यादी खेळ आहेत. हे पाण्यातील खेळ स. 8.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत सुरू असतात. असा अनोखा आनंद घेताना भक्तजनांना येथील मंदिरांची भेट समाधानकारक ठरत आहे.
- निसर्ग सौंदर्याने नटलेल्या दिवेआगर येथे आनंद लुटण्यासाठी आम्ही येतच असतो. मात्र, सुवर्ण गणेशाच्या पुनःप्रतिष्टापनेमुळे एवढ्या दिवसाची भाविकांची आतुरता पूर्ण होत आहे. गणेशाच्या दर्शनांनी समाधान होत असून ही ओढ आता मनात कायम आहे. – समीर बागुल, पुणे, पर्यटक.
- श्री सुवर्ण गणेश मुखवट्याची पुनःप्रतिष्ठापना झाल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळत आहे. त्यामुळे नेहमीच वर्दळ वाढल्याने व्यवसायात वाढ झाली आहे. – संदेश म्हसकर, व्यवसायिक.







